खड्ड्यांच्या प्रेमात प्रवासी ‘चिंब-चिंब’
By Admin | Updated: October 6, 2015 00:34 IST2015-10-05T23:09:01+5:302015-10-06T00:34:15+5:30
बसस्थानकात तळे : प्रवाशांसह विद्यार्थ्यांना माराव्या लागतायत उड्या; एसटीच्या चाकामुळे चिखल उडण्याची भीती

खड्ड्यांच्या प्रेमात प्रवासी ‘चिंब-चिंब’
कऱ्हाड : येथील बसस्थानक प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एस. टी. आगाराच्या व्यवस्थापनाबाबत सध्या सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशात आगारात पडलेल्या खड्ड्यांतूनच विद्यार्थी व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अधिकच घाणीचे साम्राज्य आगार परिसरात निर्माण झाले आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एस. टी. या ना त्या कारणाने वारंवार चर्चेत असते. सध्या या ठिकाणी विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या आगारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अगोदर असलेल्या खड्ड्यांमध्ये आता दोन दिवस पडलेल्या पावसामुळे पाणी साचल्याने त्यामध्ये पडून प्रवासी व विद्यार्थ्यांना दुखापत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आगारात मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, आगार प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना करून त्यावेळची परिस्थिती ढकलण्याचे काम केले गेले आहे. आगारमध्ये दररोज हजारोच्या संख्येने विद्यार्थी व प्रवासी ये-जा करत असतात. या ठिकाणी परजिल्ह्यातील तसेच राज्यातीलही प्रवासी येत असतात. त्यांच्याकडून या ठिकाणी असलेल्या गैरसोयींबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी प्रवाशांना सध्या पिण्यासाठी पाण्याची टाकी देखील आगार प्रशासानाकडून बांधण्यात आली नसल्याने सध्या प्रवासी व विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आगाराबाहेर जावे लागत आहेत. अशात आगारात मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी व प्रवासी त्यामध्ये पडून त्यांचा अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. कऱ्हाड आगार व्यवस्थापकांकडून विद्यार्थी व प्रवाशांच्या गैरसोयी लक्षात घेऊन संबंधित बांधकाम ठेकेदाराला आगारातील खड्डे मुजवून चांगला रस्ता तयार करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. मात्र, तशा सूचना कऱ्हाडच्या आगार व्यवस्थापकांकडून केल्या जात नसल्याने विद्यार्थी, प्रवाशांमधून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
‘मनसे’कडून पुन्हा आंदोलन होणार का ?
बसस्थानक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनास धारेवर धरत आंदोलन केले होते. एस. टी.मध्ये प्रथमोपचार पेटी ठेवली जात नाही. अग्निरोधक सिलिंडरही नसते. दिवे व ब्रेक लाईट तुटलेल्या असतात. अनेक एस. टी. नादुरुस्त व भंगार स्थितीत असताना उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारीही अशा एस.टी.वर कारवाई करीत नाहीत. तसेच बेकायदेशीरपणे थांबे उभारून प्रवासी घेतले जातात. या प्रकाराबाबत मनसेने अनेकवेळा आंदोलन केले होते. सध्या आगारात पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मनसे पुन्हा आंदोलन करेल का ? असा सवाल प्रवासी व विद्यार्थी करत आहेत.
कऱ्हाड एस.टी. आगाराला ५२ वर्षे पूर्ण...
एस. टी. महामंडळाला मोठे उत्पन्न मिळवून देणारे कऱ्हाड आगार आहे. १९६२ मध्ये बांधण्यात आलेल्या कऱ्हाड एस. टी. आगाराला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आगाराचे सध्या बांधकाम विभागाकडून नूतनीकरण केले जात आहे. या आगारामधून दररोज १६०० बसेस ये-जा होत असते.
आगाराच्या नूतनीकरणासाठी
११ कोटींचा निधी
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निधीतून आगाराच्या नूतनीकरणासाठी ११ कोटी निधी मंजूर केला आहे.