परदेशी पर्यटकांचे रिक्षातून भारतभ्रमण

By Admin | Updated: January 7, 2015 23:26 IST2015-01-07T23:03:15+5:302015-01-07T23:26:12+5:30

ये जिंदगी ना मिलेगी दोबारा : भुर्इंजमधील मिसळचा यथेच्छ पाहुणचार

Travel abroad through foreign tourists' rickshaws | परदेशी पर्यटकांचे रिक्षातून भारतभ्रमण

परदेशी पर्यटकांचे रिक्षातून भारतभ्रमण

भुर्इंज : आयर्लंडमधील एक तरुण व तीन तरुणी आॅटोरिक्षातून भटकंती करत आहेत. केरळहून राजस्थानकडे जाताना या चौघांनी भुर्इंजमध्ये यथेच्छ पाहुणचार घेत आपल्या या अनोख्या रिक्षाप्रवासाची माहितीही ‘लोकमत’शी दिली. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील मित्रांच्या भटकंतीची आठवण करून देणारी परदेश तरुण-तरुणींची भटकंती मंगळवार, दि. ६ रोजी भुर्इंजकरांनी अनुभवली. रिक्षातून भटकंती करणारे हे परदेशी पाहुणे भुर्इंज परिसरात चर्चेचा विषय ठरले.
पूर्व आयर्लंडच्या किलडेअर येथील रॉस मॅकमॅहन या तरुणासह मध्य आयर्लंडमधील आओफ डोहरसी, पूर्व आयर्लंडमधील विकलो येथील मायरेड डोहरसी, पश्चिम आयर्लंडमधील नाईम्ह फेगारसी या तीन तरुण गेली पंधरा दिवस भारतभ्रमण करत आहेत. या रिक्षातून हे चौघे केरळ, कर्नाटक आणि गोवा पाहून आता महाराष्ट्रात आले आहेत. येथून ते गुजरातमार्गे राजस्थानला जाणार आहेत. हे चौघेही इंजिनिअर असून, बीएमस, लिंक्टन, सिमेन्स, स्ट्रायकर अशा नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. हे चौघे कॉलेज जीवनातील मित्र असून, आयुष्य वाचविण्यासाठी ते भारत दौऱ्यावर पर्यटनासाठी आले आहेत.
भारत अधिक जवळून पाहता यावा, यासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांना भारताबद्दल अतिशय चांगले अनुभव आले आहेत. येथील अन्नपदार्थांची तर त्यांना भुरळच पडली आहे. मसाला डोसा, पनीर, आलूपालक, हैद्राबादी बिर्याणी अशी अस्सल भारतीय पदार्थांची नावे धडाधड सांगत त्यांनी भुर्इंजमधील एका हॉटेलमध्ये झणझणीत मिसळवर यथेच्छ ताव मारला. भारतीय फूड ‘स्पायसी’ असले तरी ‘डिलिशियस’ आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. रिक्षासारखी बंद पडत असल्याने प्रवासात व्यत्यय येत असला तरीही भारतातील लोक प्रेमळ असून, मदत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)

अतिथी देवो भव :
रिक्षातून आलेल्या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. सुरुवातीला त्यांना येथे संवाद साधताना खूपच अडचणी आल्या. काही हॉटेलमधून ते भाषेच्या अडचणीमुळे बाहेरही पडले. मात्र, राजन जाधवराव यांनी त्यांचा उडालेला गोंधळ पाहून त्यांच्याशी इंग्रजीमधून संवाद साधला आणि नंतर या परदेशी तरुणांना भुर्इंजकरांच्या अतिथी देवो भव: या भावनेची प्रचिती आली.


आओफ डोहरसी, मायरेड, नाईम्ह फेगारसी या तिघींनंी भारतीय जेवण, निसर्गसौंदर्य खूपच छान असून, येथील गाई खूपच आवडल्याचे सांगितले. रॉस याने भारताबद्दल जेवढं वाचलं होते, त्यापेक्षा भारत कितीतरी पटीने सुंदर देश असल्याचे सांगितले.

Web Title: Travel abroad through foreign tourists' rickshaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.