तब्बल १२७ वळणांचा कास रस्त्यावर प्रवास
By Admin | Updated: April 17, 2015 00:03 IST2015-04-16T23:10:50+5:302015-04-17T00:03:03+5:30
पर्यटकांनो सावधान : अतिउत्साही पर्यटक मुकतायत जीवाला

तब्बल १२७ वळणांचा कास रस्त्यावर प्रवास
सागर चव्हाण - पेट्री -सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर कास पठार व कास परिसर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याबाहेरील पर्यटकांची, तरुणवर्गाची या ठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. निसर्गाचा मुक्तपणे आनंद लुटायचा सोडून परिसरात तरुणाई स्वैराचाराने वाहने चालविताना दिसत आहेत. आयुष्याला वळण लावणाऱ्या शिक्षण संस्कार केंद्राकडे चक्क पाठ फिरवून वाहनांवर हुल्लडबाजी तसेच धूमस्टाईल करणारी अनेक कॉलेजची तरुणाई या अवघड वळणांवर आपले आयुष्य पणाला लावत आहेत.
सातारा शहराच्या बोगदा परिसरापासून सांबरवाडी, यवतेश्वर, गणेशखिंड, अनावळे, पेट्री, आटाळी, कासपर्यंत तब्बल छोटी-मोठी अशी नागमोडी, यू-टर्न असणारी १२७ वळणे आहेत. या वळणांवरून भरधाव वेगाने वाहने चालविताना समोरून येणारी वाहनेही नजरेला गुंगारा देतात. त्यामुळे वाहने चालविताना आपल्या मनाला वाटेल अशा जीवघेण्या कसरतींमुळे या अवघड वळणावर सतत अपघाताच्या घटना घडतानाचे चित्र सातारकरांनी पाहिलेले आहे. यात दोष रस्त्यावरील वळणांचा काय? उलट परिसरात फिरायला येणारी तरुणाई दुचाकी चालविताना अनेक प्रकारची हुल्लडबाजी करून स्वत: अपघाताला आमंत्रित करत आहेत, याला तीव्र उतारावर आऊट आॅफ मारणाऱ्या चारचाकी, जडमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही अपवाद वगळता येत नाही.
हीच तरुणाई जेव्हा मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून भरधाव वेगाने प्रवास करताना दुचाकीवर अनेक धूमस्टाईल मारून मोक्याच्या निश्चित ठिकाणी आपल्या करिअरला वळण लावायचे सोडून धोक्याच्या वळणावर आयुष्याचा शेवट करताना दिसत आहेत. अनेक जीवघेण्या कसरती, मोबाईलचा सर्रास वापर अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत अपघाताला बळी पडत आहेत. अशा अपघातप्रसंगी प्राथमिक उपचाराची जवळपास कोणतीही सोय नसताना या तरुणाईला कोणी शिकवायचे, असा प्रश्न आहे.