सापळा रचला.. अन् शंका आल्याने फसला !
By Admin | Updated: July 3, 2016 00:11 IST2016-07-03T00:11:17+5:302016-07-03T00:11:17+5:30
लाच : महिला डॉक्टरसह पतीला अटक

सापळा रचला.. अन् शंका आल्याने फसला !
सातारा : ‘एसीबी’ने लाच मागणाऱ्या व्यक्तीकडे खातरजमा करण्यासाठी दिलेले ‘गोपनीय’ इलेक्ट्रॉनिक साहित्य संशयित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निदर्शनास येताच एसीबीने रचलेला सापळा फसला. त्या महिला अधिकाऱ्याने एसीबीचे साहित्य आणि तक्रारदाराचा मोबाइल आपटून त्याचे नुकसान केले. जेणेकरून पुरावा राहणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली; मात्र तक्रारदाराकडे पन्नास हजारांची केलेली मागणी निष्पन्न झाल्याने दोघांनाही अटक करण्यात आली.
बावधन, ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आशा बांगर आणि त्यांचा पती अंकुश जाधव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोग्य कर्मचाऱ्याला रजेवरून कामावर हजर करून घेण्यासाठी डॉ. बांगर यांनी एक लाखाची मागणी केली. तडजोडीनंतर पन्नास हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीने ३० जून रोजी तक्रारदाराला डॉ. बांगर यांच्याकडे पाठविले. जाताना तक्रारदाराजवळ रेकॉर्ड करण्याचे साहित्य दिले. डॉ. बांगर यांनीे पैसे पती अंकुश जाधवकडे देण्यास सांगितले होते.
त्यानुसार तक्रारदार डॉ. बांगर यांच्या निवासस्थानी गेला. यावेळी तेथे डॉ. बांगर आणि पती घरात होते. तक्रारदाराने पैशाच्या अनुषंगाने विषय काढला. बोलता-बोलता डॉ. बांगर यांच्या पतीला शंका आली. तक्रारदाराच्या शर्टच्या खिशात काहीतरी आहे. त्यामुळे त्याने खिसा तपासला. खिशात एसीबीने दिलेले गोपनीय इलेक्ट्रिक साहित्य दिसले. त्यानंतर त्याने ते काढून घेतले. आपल्यावर ट्रॅप लावला गेलाय, हे लक्षात येताच त्यांनी घेतलेल्या वस्तूमधील मेमरीकार्ड व सेल काढून नुकसान केले. एवढेच नव्हे तर या वस्तू डॉ. बांगर यांच्या पतीने नदीत फेकून देऊन पुरावा नष्ट केला. मात्र, पैसे मागितल्याचे निष्पन्न झाल्याने, तक्रारदाराला दमदाटी तसेच साहित्याचे नुकसान केल्याने डॉ. बांगर आणि पती जाधवला वाई पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दि. ६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)