गाड्या पंक्चर... बसस्थानकात क्रिकेट!
By Admin | Updated: May 1, 2015 00:16 IST2015-04-30T23:13:54+5:302015-05-01T00:16:18+5:30
रिक्षाचालकांची ‘चांदी’ : परिवहन कर्मचाऱ्यांचा संप दुपारनंतर मागे

गाड्या पंक्चर... बसस्थानकात क्रिकेट!
सातारा : नव्या परिवहन कायद्याला विरोध करण्यासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दुपारी साडेबारा वाजता मागे घेण्यात आला. मात्र, तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेक एसटी गाड्या पंक्चर केल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले, तर रिक्षावाल्यांची चांदी झाली. संप मागे घेईपर्यंत काही कर्मचाऱ्यांनी क्रिकेटचा डाव मांडला होता. परिवहन क्षेत्रात खासगीकरण वाढविणारा नवा कायदा लवकरच करणे प्रस्तावित आहे. या कायद्यानुसार परिवहन क्षेत्रात परकी थेट गुंतवणूक येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन कर्मचारी संतापले असून, काही संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच नव्या कायद्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जादा शिक्षेची तरतूद असल्यामुळे रिक्षाचालकांनीही संपात उतरण्याचे ठरविले होते. मात्र, कोणत्या संघटनांचा संपाला पाठिंबा आहे, हे गुलदस्त्यातच राहिले. दिवसभर रिक्षांची वर्दळ तुरळक सुरूच होती. तथापि, काही रिक्षाचालक या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे आढळून आले. नेहमीपेक्षा जास्त भाडेआकारणी केल्याची तक्रार प्रवासी करीत होते. संपाची बातमी प्रवाशांना समजल्याने बसस्थानक ओस पडले होते. पहाटे पाच वाजल्यापासून गाड्या बसस्थानकाबाहेर जाणे बंद झाले. दुपारी साडेबारा वाजता संप मागे घेण्याचा निर्णय होईपर्यंत सात तास बसवाहतूक बंद राहिली. या काळात संपात सहभागी झालेल्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी स्थानकातच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. अनेक बसेसचे टायर पंक्चर करण्यात आल्याचे दिसून आले. बाहेरच्या आगारातील चालक-वाहकांना पंक्चर काढण्यासाठी व इतर दुरुस्तीसाठी स्थानिक मेकॅनिक मिळत नव्हता. त्यामुळे ते स्वत:च चाक खोलताना-जोडताना दिसत होते. दुपारी साडेबारानंतर मात्र परिस्थिती पूर्वपदावर आली. (प्रतिनिधी)
१२५ फेऱ्या रद्द
संपात एसटीचे कामगारही सहभागी झाले होते. ज्या गाड्या परजिल्ह्यातून मुक्कामासाठी आल्या होत्या. अशा चालकांनी पहाटे पाचच्या सुमारास गाड्या नियोजित वेळेत फलाटात लावल्याही. मात्र, सातारा आगारात काही कर्मचाऱ्यांनी गाडी न लावण्यास सांगितले. त्यानंतर गाड्यांमधील हवा सोडणे, पंक्चर करणे आदी प्रकार केले. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत सुमारे सव्वाशे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.