पत्री मारण्याचा व्यवसाय अडचणीत शेती, वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर
By Admin | Updated: April 10, 2015 23:49 IST2015-04-10T21:33:30+5:302015-04-10T23:49:38+5:30
बैलांनी मशागत कमी झाली

पत्री मारण्याचा व्यवसाय अडचणीत शेती, वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर
किरण मस्कर - कोतोली शेती, वाहतुकीसाठी बैलांची जागा आता टॅ्रक्टर ट्रेलरने घेतल्याने बैलांच्या पायाला पत्री मारण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात बैलगाड्यांचा वापर केला जात होता. मात्र, बैलांचा वापर करणारे शेतकरी आता ट्रॅक्टरकडे वळत आहेत. त्यामुळे बैलांच्या पायाला इजा होऊ नये, यासाठी (नालबंदी) पत्री मारण्याच्या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. बैलांच्या पायाला कमीत-कमी सहा व जास्तीत जास्त आठ पत्र्या माराव्या लागतात. यासाठी २५० पर्यंत खर्च येतो. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेजारील साखर कारखान्यांना सुमारे १५० ते २०० बैलगाड्या उसाची वाहतूक करीत होत्या. पावसाळ्यात बैलांकरवी शेतात काम केले
जाते. सध्या नवीन औजारांबरोबर ट्रॅक्टरचीही संख्या वाढली आहे. त्यातच बैलांना सांभाळणे परवडणारे नसल्याने बैलांची संख्या कमी झाली. त्यामुळे पत्री मारणाऱ्यांना काम मिळेनासे झाले आहे.उसाची वाहतूक करताना किमान १० ते १५ दिवसांमधून एकदातरी पायाला पत्री मारावीच लागते. डांबरी रस्त्यावरून चालताना पत्री नसल्यास बैल घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पायाच्या वाढलेल्या नख्या खुडून पत्री मारतात.
बैलांनी मशागत कमी झाली
पूर्वी शेतीमध्ये बैलांची औतकरणी केल्यानंतर शेताची मशागत चांगली होत होती. पीकही चांगले यायचे, तर मिळालेल्या उत्पादनामधून बळिराजा सुखी व्हायचा; पण बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैल सांभाळणेही आता अवघड झाले आहे. ट्रॅक्टरने जरी शेतीची मशागत केली, तरी बैलांनी मशागत करणारा पूर्वीचा बळिराजा गायब व्हायला
लागला आहे.
- युवराज पाटील, पोपट पाटील, (कोडोली) औत संघटना