वाहतूक कोंडी, स्वच्छतागृहामुळे गदारोळ
By Admin | Updated: April 19, 2015 00:37 IST2015-04-19T00:37:54+5:302015-04-19T00:37:54+5:30
वाई नगरपालिका सभा : दोन विषय तहकूब; ३९ विषयांना मंजुरी

वाहतूक कोंडी, स्वच्छतागृहामुळे गदारोळ
वाई : वाई नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेतील अजेंड्यावर नसलेले विषय आयत्या वेळच्या विषयात घेऊन प्रोसिडिंग लिहिल्याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावून मुख्याधिकाऱ्यांनी दिखावा केला; परंतु कार्यवाही न केल्याने तसेच शहरातील वाहतुकीची कोंडी व महागणपती परिसरातील महिलांसाठीचे स्वच्छतागृहाच्या विषयांमुळे सभेत गदारोळ माजला. यावेळी विषय पत्रिकेवरील दोन विषय तहकूब तर एक विषय रद्द करण्यात आला. उर्वरित ३९ विषय मंजूर करण्यात आले.
वाई नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी आशा राऊत उपस्थित होते.
यावेळी विषय पत्रिकेवरील लेखा परीक्षणातील प्रलंबित शंकांची पूर्तता करण्यासाठी पूर्तता अहवाल सादर करण्यास मान्यता देणे व एकात्मिक शहर गृह निर्माण विकास प्रकल्प योजनेसंदर्भातील आलेल्या पत्रावर निर्णय घेणे, हे विषय तहकूब करण्यात आले. तर पालिकेकडील विविध निरुपयोगी वाहनांच्या लिलावास मंजुरी देणे हा विषय रद्द करण्यात आला. प्रारंभी सत्ताधारी नगरसेवक अनिल सावंत व विरोधी जनकल्याण आघाडीचे नगरसेवक सचिन फरांदे यांनी मागील २३ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या सभेतील मूळ अजेंड्याशिवाय आयत्या वेळच्या विषयामध्ये बेकायदेशीररीत्या समाविष्ठ केलेले आर्थिक बाबींचे विषय यांची मुख्याधिकारी यांनी केलेली अंमलबजावणी या विषयावर मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी यांनी ती संबंधित कर्मचाऱ्याची चूक होती, असे सांगून त्याला नोटीस बजावली असल्याचे सांगितले. या उत्तराने समाधान न झाल्याने फरांदे व सावंत यांनी त्याच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला. यावर सभागृहात प्रचंड गोंधळ माजला. याबाबत नगराध्यक्ष गायकवाड यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु याविषयावर विरोधी सचिन फरांदे व अनिल सावंत यांनी संबंधित प्रशासन सहायक दीपक गोंजारी यांना सभेत विषय झाले नव्हते, ते प्रोसिडिंगवर लिहिलेच कसे? तुमच्या मनाने लिहिले काय? असे प्रश्न विचारले असता आॅफिसने सांगितले म्हणून मी लिहिले, असे उत्तर दिले. यावर मुख्याधिकारी यांना तुम्ही यावर काय कारवाई करणार. हे सगळे आपल्याला माहीत असूनही आजच्या सभेतही गोंजारी यांनाच प्रोसिडिंग लिहिण्यास कसे बसविले? असा प्रश्न उपस्थित करून सभागृहात गोंधळ केला.
यानंतर सावंत यांनी ‘नगरसेवकांना विश्वासात न घेता पालिकेचा कारभार सुरू असून, मुख्याधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप केला. पालिकेचा मेल आयडी व पासवर्ड तसेच मागितलेली माहिती देण्याचे टाळले जाते. गेली वर्षभर पालिकेचा फोन बंद आहे. त्यामुळे जनतेला समस्या व संवाद साधता येत नाही,’ आदी प्रश्न निदर्शनास आणून दिले. यावर मुख्याधिकारी यांनी पासवर्ड देता येत नाही, तसेच नियमानुसार दैनंदिन कामकाज नगराध्यक्षांशी चर्चा करून व माहिती देऊनच केले जात असल्याचा खुलासा केला.
नगरसेविका अनुराधा कोल्हापुरे यांनी शहरातील वाहतुकीची कोंडी व महागणपती मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त करत त्यासाठी जागेची उपलब्धी करावी, अन्यथा यात्री निवासमधील एक गाळा
यासाठी वापरण्यात यावा, असा आग्रह धरला.
यावेळी सभेत कचरा संकलन वाहनांना जीपीएस प्रणाली बसविणे, कृष्णा नदीचे संवर्धन व संतुलन राखण्यासाठी अंमलबजावणी करणे, शहरातील बंदिस्त गटार व रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक बसविणे, गट शौचालयासाठी अनुदान मंजूर करणे, झोपडपट्टी लाभधारकांच्या घरांसाठी विद्युत कनेक्शन मिळवून देणे आदींसह विषय पत्रिकेवरील इतर विषय मंजूर करण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक महेंद्र धनवे, डॉ. अमर जमदाडे, बुवा खरात, धनंजय मोरे, कैलास जमदाडे यांनी सहभाग घेतला.
सभेस नगरसेवक सुभाष रोकडे, शोभा शिंदे, सविता हगीर, सीमा नायकवडी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)