दुचाकीस्वारांनी ट्राफिक इन्स्पेक्टरला उडविले!
By Admin | Updated: May 27, 2016 22:21 IST2016-05-27T22:15:38+5:302016-05-27T22:21:47+5:30
राजपथावर थरार : पोलिस अधिकारी सुरेश घाडगे जखमी; गाडीच्या नंबरप्लेटमुळे खात्याला चोरीचा संशय

दुचाकीस्वारांनी ट्राफिक इन्स्पेक्टरला उडविले!
सातारा : राजपथावरील एकेरी वाहतुकीतून भरधाव वेगात निघालेल्या मोटारसायकलस्वारांना अडविण्याचा प्रयत्न करताना दोन दुचाकीस्वारांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे यांच्या अंगावर गाडी घातली. यात घाडगे जखमी झाले असून, या दोघांना पकडण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांना अखेर यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातील मंगळवार पेठेतील पापाभाई पत्रेवाला चाळ परिसरात राहणाऱ्या आरबाज रज्जाक बागवान (वय २२) याच्यासह एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहर वाहतूक विभागाच्या जीपमधून सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे त्यांचे सहकारी प्रल्हाद गुजर व इतर टीम शहरातून फेरफटका मारत असताना राजलक्ष्मी टॉकीजजवळ आले. यावेळी राजपथावरून एकेरी वाहतूकीचा नियम मोडत मोती चौकाकडून भरधाव वेगात एक मोटारसायकल आली. हे पाहून घाडगे यांनी या दुचाकीस्वारांना हात करून थांबण्याचा इशारा केला.
मात्र, या दुचाकीस्वारांनी किंचितही वेग कमी न करता आपली मोटारसायकल थेट घाडगे यांच्या अंगावर घातली. भर वेगातील या मोटारसायकलने उडविताच घाडगे जवळपास दहा ते बारा फूट लांब उडून पडले. हे पाहताच जीपमधील इतर सहकाऱ्यांनी तत्काळ रस्त्यावर झेप घेतली. अन् या दोन दुचाकीस्वारांवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मोटारसायकलच्या धडकेत घाडगे यांचा हात मोडला असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून फ्रॅक्चर टाकण्यात आले. यानंतर अधिकाऱ्यावर हल्ला केला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी या दोन तरुणांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
एकेरी वाहतुकीच्या काळात पोलिस मुख्यालयासमोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार विरुद्ध बाजूने जात असतात. अशीच परिस्थिती शहरातील इतर रस्त्यांवरही असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत वाहतूक कर्मचारी नियमन कमी आणि दिलेल्या कोट्यामुळे दंड संकलनामध्येच जास्त गुंतलेले असतात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य वाहनधारक त्रासले आहेत. कोटा आणि दंड संकलन झाले की, इतर बाबींत गुंतणाऱ्या या वाहतूक कर्मचाऱ्यांमुळे साताऱ्यातील वाहतूक खऱ्या अर्थाने बेशिस्त झाली आहे. (प्रतिनिधी)
राजपथावर एकेरी वाहतुकीचा नियम भंग करत हे दोन तरुण निघाले होते, म्हणून मी त्यांना ‘परत जा’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर गाडी घातली. माझ्या अंगावरील ड्रेस अन् बाजूची ट्राफिक खात्याची गाडी बघून तरी ते थांबतील, असे मला वाटले होते. मात्र, असा आततायीपणा घडेल, हे ध्यानीमनीही नव्हते.
- सुरेश घाडगे, सहायक
पोलिस निरीक्षक
दुचाकी नेमकी कोणाची ?
घाडगे यांना जखमी करणाऱ्या आरबाज रज्जाक बागवान व एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दुचाकीवर नंबरप्लेट नव्हती. ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात
सुरू होती.