फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून वारंवार केली जात आहे.
०००००००
मास्कचा विसर
सातारा : शासकीय तसेच खासगी कामासाठी असंख्य लोकांना साताऱ्यात यावे लागते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. मात्र तरीही अनेकांना मास्कचा वापर करण्याचा विसर पडत आहे. दुसरी लाटेतून कसे तरी जिल्हा बाहेर पडत असताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा धोका कायम आहे.
००००००००
सातारा परिसरात मोरांचा वावर वाढला
सातारा : तालुक्यात ठिकठिकाणी नदीकाठच्या शिवारात मोरांचा वावर वाढला आहे. नदीकाठी सकाळी सकाळी मोरांचे आवाज घुमत आहेत. शहरातही महादरे, आंबेदरे, शाहूपुरी या परिसरात असे आवाज येत आहेत. सर्वत्र हिरवळ पसरली असून अधूनमधून ढग जमा होत आहेत. त्यामुळे मोरांसाठीही आल्हाददायी वातावरण तयार झाले आहे.
००००००००००
रस्त्याकडेला कचरा
कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. खाद्यपदार्थांच्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांतून वारंवार करण्यात येत आहे.
००००००
रस्त्याची दुर्दशा
सातारा : सातारा शहरालगत देगाव फाटा, शिवराज चौक, वाढे फाटा या परिसरात उड्डाणपूल व रस्त्यावरून ओव्हरलोड मातीच्या वाहनांमुळे शेंद्रे परिसरातील रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. त्यातच पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे वेळीच योग्य त्या उपाययोजना न केल्यास रस्ता बिकट होऊ शकतो.
०००००००००
बेपर्वाई तरुणांकडून मास्म रस्त्यावर
सातारा : साताऱ्यातील अनेक तरुण रात्री मित्रांसोबत एकत्र येतात. तेथे गप्पा मारताना कोणाच्याही गाड्यांच्या हॅण्डलवर मास्क काही वेळासाठी काढून ठेवतात अन् तसाच विसरून जातात. याच गाड्यांजवळ लहान मुलं आल्यास ते मास्कला हात लावत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
०००००००
खुटबाव रस्ता दयनीय
पळशी : माण तालुक्यातील मार्डी-खुटबाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खडी उखडली आहे, तर बऱ्याच ठिकाणी रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होते.
००००००
शाळेचे सर्वांना वेध
फलटण : सातारा शहरासह जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरायला लागली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र अद्याप शाळा सुरू झालेल्या नसल्याने त्या कधी सुरू होतील याबाबत शाळा प्रशासनाकडे विचारणा होत आहे.
०००००
राजवाडा बसस्थानक एसटी की जीपसाठी
सातारा : राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा तालुक्यातील ग्रामीण भागासाठी राजवाडा बसस्थानकातून एसटी सोडल्या जातात. मात्र शुक्रवारी दुपारी बसस्थानकाच्या दारात कार, जीप लावण्यात आल्या होत्या. या गाड्या समोरच आडव्या लावल्याने एसटीला आत जायलाही जागा नव्हती. त्यामुळे बसस्थानक नक्की कोणासाठी असा प्रश्न पडतो.