परंपरागत लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:30+5:302021-03-25T04:37:30+5:30
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामाच्या सुगीला सुरूवात झाली की, ग्रामीण भागात लोककलाकारांची वर्दळ सुरु ...

परंपरागत लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर!
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामाच्या सुगीला सुरूवात झाली की, ग्रामीण भागात लोककलाकारांची वर्दळ सुरु असायची. खळ्यावर, रस्त्यावर कला सादर करून पोटाची खळगी भरली जात होती. मात्र, अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागातील हे चित्र बदलले असून, लोककला लोप पावत चालली आहे. सुगीच्या काळात बळीराजाकडून पसाभर धान्य मिळण्यासाठी दारावर येणाऱ्या लोककलाकारांमध्ये नंदीबैलवाले, कडकलक्ष्मी, पिंगळा, कुडमुडे ज्योतिषी अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. या कलाकारांद्वारे शेतकऱ्यांचे मनोरंजन होण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानातही भर पडत होती. गोंधळी, मनकवडे आपला वेगळाच ठसा उमटवायचे. याशिवाय नंदीबैलवाले पावसाचा, लग्नाचा आणि पैशांचा अंदाज सांगायचे. या लोककलाकारांचे पोषाखही लक्ष वेधून घेणारे होते. पांढरेशुभ्र धोतर, पांढरा शर्ट, त्यावर काळा कोट, डोक्यावर पागोटे, हातात तुणतुणे, कमरेला घट्ट बांधलेले दोन पडघम, काखेत झोळी असा त्यांचा वेश असायचा. अशा वेशातील ही मंडळी विविध गुणांचे दर्शन घडवत होती.
पोलिसांचा वेश घालून हसविणारा बहुरूपी हजरजबाबीपणामुळे लक्ष वेधून घेत असे. पिंगळा, ज्योतिषी, वासुदेव आदींचा पोषाखही लक्षणीय असायचा. असे हे अवलिया बदलत्या परिस्थितीमुळे समाजातून हरवले आहेत. काही कला आजही काहीजणांनी जिवंत ठेवल्या असल्या तरी बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचे महत्व कमी झाले आहे. अलीकडे त्यांचे दर्शन ग्रामीण भागात क्वचितच होते.