शासकीय कार्यालयासह व्यापारीही फलकावर
By Admin | Updated: March 16, 2016 23:47 IST2016-03-16T22:05:58+5:302016-03-16T23:47:42+5:30
कऱ्हाड : वसुलीसाठी पालिकेची कारवाई

शासकीय कार्यालयासह व्यापारीही फलकावर
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात मागील दोन वर्षांपासून असलेल्या थकबाकीधारकांना नोटिसा बजावल्यानंतर त्यास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेकडून सोमवार पेठ व शनिवारी पेठेतील थकबाकीधारकांच्या नावांचे फलक यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी बुधवारी (दि. १६) दुपारी लावण्यात आले. विशेष म्हणजे, या फलकावर अनेक मोठ्या शासकीय कार्यालयासह व्यापाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे.
पालिकेच्या सात प्रभागांतील असलेल्या थकितधारकांमध्ये ६ हजार ११६ हून अधिकांचा समावेश आहे. या थकबाकीधारकांच्या नावांचे फलक नुकतेच पालिकेकडून तयार करण्यात आले होते.
तसेच ते लवकरच लावले जातील, असे कऱ्हाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी शनिवार पेठ व सोमवार पेठेतील थकबाकीधारकांच्या नावांचे फलक ट्रॅक्टरमधून शहरात लावण्यासाठी बाहेर काढण्यात आले.
मात्र त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा कऱ्हाड शहरातील सर्व पेठांतील फलक लावण्यात आले. (प्रतिनिधी)
कऱ्हाड शहरातील पालिकेच्या संकलित कर थकबाकीधारकांना शेवटची सूचना करण्यात येत आहे की, त्यांनी तत्काळ आपली थकित कराची रक्कम पालिकेच्या करवसुली विभागात जमा करावी; अन्यथा त्यांच्या घरासमोर बँड-बाजा वाजवून त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल.
- विनायक औंधकर, मुख्याधिकारी
थकबाकी...
तालुका निरीक्षक भूमिअभिलेख कऱ्हाड - ५४ हजार ५०४
मंडलाधिकारी कऱ्हाड महसूल - १ लाख २९ हजार २५६
शासकीय धान्य गोदाम - ८ लाख २१ हजार ३४१
उपअभियंता बांधकाम विभाग - १ लाख ४५ हजार २५०
उपविभागीय अधिकारी बंगला - ६२ हजार ५६४
सह्याद्री भवन गृहनिर्माण संस्था - २ लाख ४० हजार ३१६
कऱ्हाड पंचायत समिती - ४ लाख १९ हजार ८०१