ऊस वाहतुकीसाठी अवजड वाहनांचा वापर केला जातो. ट्रक, ट्रॅक्टरच्या साह्याने लांबच्या गावाचा ऊस आणला जातो. तसेच कारखाना परिसरातील वाहतूक ही बैलगाडीने केली जाते. कऱ्हाड शहरातून जाणाऱ्या बैलगाड्या व अवजड वाहनांची दिवसभर रेलचेल सुरू असते. शिवाय प्रवाशांना ने-आण करणारी वडाप वाहतूक, एसटी, खासगी वाहने तसेच दुचाकी वाहनांचीही दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना भरलेला ऊस लवकरात लवकर कारखान्यात पोहोचविण्याची घाई असते. त्यामुळे काही वाहनधारक उसाने भरलेली वाहने बेदरकारपणे चालवतात. तसेच आपल्या वाहनातून व गाडीतून क्षमतेपेक्षा जादा उसाची वाहतूक करतात. त्यामुळे तीव्र उतारावर तसेच वळणावरील खड्ड्यातील रस्त्यावरून जाताना वाहने पलटी होतात. त्यामुळे अपघातही होतात.
क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करताना पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनांना साईड न दिल्यामुळे वाहतूक कोंडीही होत असल्याची सध्या पाहावयास मिळत आहे. असे प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासन व कारखाना यंत्रणेने अशा क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांवर दंड आकारावा. तसेच त्यांना योग्य त्या सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
- चौकट
लाल कपड्याचा वापर
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांकडून रात्रीच्यावेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनाना वाहन दिसावे म्हणून लाल रंगाचे कापड ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस लावले जात आहे. उसाने भरलेले ट्रॅक्टर रस्त्याच्या मध्यभागातून चालविले जात असल्याने पाठीमागून येणाऱ्या चालकांना आपले वाहन पुढे घेताना कसरत करावी लागत आहे.