मानवी वस्तीत वावरणाऱ्या बिबट्याचं ट्रॅकिंग गरजेचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:44+5:302021-09-02T05:24:44+5:30

सातारा : अजिंक्यताऱ्याच्या वनात वास्तव्य करणारा बिबट्या कधी शाहूनगरवासीयांना, तर कधी सोनगावकरांना आपल्या दर्शनाने मुग्ध करतो. आता तो थेट ...

Tracking of leopards in human habitat is needed | मानवी वस्तीत वावरणाऱ्या बिबट्याचं ट्रॅकिंग गरजेचं

मानवी वस्तीत वावरणाऱ्या बिबट्याचं ट्रॅकिंग गरजेचं

सातारा : अजिंक्यताऱ्याच्या वनात वास्तव्य करणारा बिबट्या कधी शाहूनगरवासीयांना, तर कधी सोनगावकरांना आपल्या दर्शनाने मुग्ध करतो. आता तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच दिसल्याने सगळी यंत्रणा सज्ज झाली आणि बारा तास त्याचा शोध घेतला. पण या शोधात वन विभागाच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे मानवी वस्तीत वावरणाऱ्या बिबट्याच्या शेपटीत चिप बसवून त्याच्या वावरक्षेत्राची माहिती मिळविणे गरजेचे बनले आहे.

सातारा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोमवारी सायंकाळी एका कर्मचाऱ्याला बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल साडेतीन तासाच्या वन विभागाच्या सर्च ऑपरेशननंतर रात्री बारा वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या श्वानपथकाने बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस काही हाती लागले नाही. तो प्राणी बिबट्याच आहे का? याची खातरजमा करण्यासाठी वन विभागाने कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दोन कॅमेरा ट्रॅप बसविले. शिवाय कर्मचाऱ्यांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

सातारा शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. मानवी वस्तीलगतच्या या बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या बिबट्यांच्या शेपटीत मायक्रो चिप बसवावी, अशी सूचना साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. त्यामुळे बिबट्यांच्या हालचालींवर वन विभागाने लक्ष ठेवण्यासाठी मायक्रोचिपचा वापर करावा. ही पद्धत नवीन नाही. इतर शहरात अवलंबली जाते. त्यामुळे बिबट्याची हालचाल किंवा त्याचे वावर क्षेत्र लक्षात येते. मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये यासाठीची दक्षता घेता येते.

याबरोबरच शहराच्या परिसरात टाकला जाणारा घरातील खाद्यकचरा (किचन वेस्ट), हॉटेल्सचे खरकटे व हॉस्पिटल्समधून ऑपरेशननंतर बाहेर टाकले जाणारे मानवी अवयव हे काही ठिकाणी उघड्यावर पडतात. मोकाट कुत्री त्यावर गुजराण करतात. साहजिकच सहज भक्ष्य म्हणून बिबट्या मानवी वस्तीत येत आहे. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी शहराच्या हद्दीवर पडणाऱ्या या कचऱ्याचे योग्य नियोजन स्थानिक स्वराज्य संस्थेने करावे, अशी गरज सुनील भोईटे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच बिबट्या असल्याचे समजल्यानंतर युध्दपातळीवर यंत्रणा हलवून शोधमोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी राबविली.

चौकट :

बिबट्या येण्यासाठी खाद्याची उपलब्धता जबाबदार!

शाहूपुरी, शाहूनगर, माची पेठ आणि सैनिक स्कूल आवार याठिकाणी बिबट्याचा वावर आढळला आहे. टेरिटोरियल वॉर आणि सहज उपलब्ध होणारे खाद्य यामुळे मनुष्यवस्तीकडे बिबट्यांचा कल वाढला आहे. नागरिकांनी किचनमधील ओला कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीचा वापर करावा अथवा त्याचे घरच्या घरी खत बनवावे. त्यामुळे बिबट्यांना शहराकडे आकर्षित व्हायला निमंत्रण मिळणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

अशी राबली यंत्रणा...

१ वनक्षेत्रपाल

३ वनपाल

६ वनरक्षक

२ मजूर

२ वाहनचालक

२ श्वानपथकाचे वनरक्षक

१ श्वान

३ जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी

२ कॅमेरा

मोहिमेची वेळ :

रात्री : ८.३० ते १२

सकाळी : ६ ते १०

कोट :

जिल्हाधिकारी कार्यालयात ज्यांनी बिबट्यासदृश प्राणी पाहिला, त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही यंत्रणा सज्ज ठेवली. पण पावसामुळे बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळून आले नाहीत. तरीही आम्ही आमचे दोन कर्मचारी आणि कॅमेरा ट्रॅप लावला आहे. यात काही आढळले तर त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.

- डॉ. निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल, सातारा

Web Title: Tracking of leopards in human habitat is needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.