हिरवाईच्या सोहळ्यात पर्यटकांची मौज
By Admin | Updated: August 3, 2014 22:48 IST2014-08-03T22:16:31+5:302014-08-03T22:48:28+5:30
ठोसेघर धबधबा : श्रावणसरी अंगावर झेलण्यात तरुणाई तल्लीन

हिरवाईच्या सोहळ्यात पर्यटकांची मौज
परळी : हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी ठोसेघर परिसरात पर्यटकांचा जणू मेळा भरत आहे.
शनिवार व रविवार सुटी असल्याने याठिकाणी राज्यभरातून पर्यटकांनी हजेरी लावून निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटला.
वैशाख वणव्यात होरपळून निघालेली सृष्टी आता संततधार पावसामुळे बहरून आली आहे. हिरवाईचा शालू पांघरलेली धरती पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. रंगबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेत आहेत. गवताच्या पात्यांवर विसावलेले पाण्याचे थेंब मोत्यासमान भासत असल्याने पर्यटक ते तळहातावर अलगद झेलताना दिसत आहेत. डोंगरदऱ्यांतून खळखळणाऱ्या छोट्या धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत.बोरणे घाटातील नागमोडी वळणावर थांबून निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवत पर्यटक पावसात मनसोक्त भिजत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात येथील सदाबहार निसर्ग माणसाला जणू आत्मिक आनंद देत आहे. शनिवार, रविवारी पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथून पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. यामध्ये नवदाम्पत्यांसह तरुणाईची संख्या लक्षणीय होती. रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून पावसात भिजण्यात तल्लीन असलेली तरुणाई ठिकठिकाणी पाहायला मिळत होती. रानमेवा आता मिळत नसला तरी भुरभुर पावसात गरमागरम मक्याची कणसे, भजी, शेंगदाणे, पॉपकॉर्नचा आस्वाद पर्यटक घेतला. (वार्ताहर)