पर्यटकांनो सावधान, अकस्मात कोसळेल संरक्षक कठडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:23+5:302021-07-22T04:24:23+5:30
पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात सांबरवाडी फाट्यापासून काही अंतरावर साताऱ्याकडे येताना सोमवारी साधारण पाच ते सात ...

पर्यटकांनो सावधान, अकस्मात कोसळेल संरक्षक कठडा !
पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात सांबरवाडी फाट्यापासून काही अंतरावर साताऱ्याकडे येताना सोमवारी साधारण पाच ते सात मीटर लांबीचा संरक्षक कठडा ढासळल्याने एखादा अनर्थ घडण्यापूर्वी तत्काळ बांधकाम विभागाकडून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकापट्टी तसेच सूचना फलक लावून याठिकाणी संरक्षक कठड्याच्या नवीन बांधकामाला वेगाने सुरुवात झाल्याने ग्रामस्थ, पर्यटक, वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांचे बांधकाम ब्रिटीशकालीन असून, कित्येक वर्षांपूर्वीचे जुने संरक्षक कठडे नादुरुस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने बहुतांशी ठिकाणी नवीन संरक्षक कठडे बांधले आहेत. परंतु, अद्यापही बऱ्याच ठिकाणी जुनेच संरक्षक कठडे असून, यातील काही कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पश्चिमेकडील भागात पावसाची संततधार, अधूनमधून पडणारा मुसळधार पाऊस तसेच काही कठड्यांचे बांधकाम जुने असल्याने सांबरवाडीहून साताऱ्याकडे येताना घाटात सोमवारी साधारण पाच ते सात मीटर लांबीचा कठडा ढासळल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.
शहराच्या पश्चिमेला नागरिक, पर्यटक, वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाकडून तत्काळ उपाययोजना करत सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी बाजूने धोकापट्टी तसेच सूचना फलक लावण्यात आले असून, कठड्याचे साधारण दहा मीटर लांब व साडेपाच मीटर उंचीपर्यंत नव्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संरक्षक कठडा ढासळल्याने अपघाताचा धोका टाळण्यासाठी कठड्याचे नव्याने बांधकाम सुरू असल्याने वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
(चौकट)
एकेरी वाहतूक सुरू...
रस्त्याच्या एका बाजूला पावसाळ्यात कोसळणारी दरड तर दुसऱ्या बाजूला संरक्षक कठड्यांची दुरवस्था, त्यात काही दिवसांपूर्वीचे रस्त्याच्या भेगेचे संकट आणि आत्ता दोन दिवसांपूर्वी ढासळलेला कठडा यामुळे घाटातील वाहतूक धोकादायक झाल्याचे म्हटले जात आहे. २०१७मध्ये ऑक्टोबर महिन्यात यवतेश्वर घाटातील रस्ता खचून वाहतूक ठप्प होऊन काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती. काही आठवड्यांपूर्वी रस्त्याला भेग पडून कठड्याची भिंत फुगल्याने नवीन कठड्याचे बांधकाम करण्यात आले. सध्या दुसऱ्या ठिकाणी ढासळलेल्या कठड्याचे नव्याने बांधकाम सुरू असून, पावसाने साथ दिल्यास चार दिवसात काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.
२१पेट्री
यवतेश्वर घाटात ढासळलेल्या संरक्षक कठड्याचे नवीन बांधकाम बांधकाम विभागाकडून वेगाने सुरू आहे.
(छाया : सागर चव्हाण)