महाबळेश्वरात पर्यटकांचा ‘सेल्फी विथ धबधबा’

By Admin | Updated: August 1, 2016 00:48 IST2016-08-01T00:48:08+5:302016-08-01T00:48:08+5:30

पावसातही घोडसवारीला पसंती : सलग सुट्यांमुळे नंदनवन बहरले; गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी

Tourism's 'Selfie With Waterfall' in Mahabaleshwar | महाबळेश्वरात पर्यटकांचा ‘सेल्फी विथ धबधबा’

महाबळेश्वरात पर्यटकांचा ‘सेल्फी विथ धबधबा’

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, पावसाची रिपरिप, दाट धुके अंगात हुडहुड भरणारी थंडी, हिरवागार निसर्ग अशा वातावरणात पर्यटक येथील हिरवाईचा मनमुराद आनंद लुटत आहेत. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या येथील लिंगमळा धबधबा, अंबेनळी धबधबा, वेण्णा लेक परिसर पर्यटकांनी बहरून जात आहे. अनेक पर्यटक याठिकाणी धबधब्यांसंगे ‘सेल्फी’ काढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सलग सुट्यांमुळे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगलीसह गुजराती पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याने महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे.
सध्या महाबळेश्वरातील लिंगमळा व अंबेनळी घाटातील धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. काहीजण सैराटच्या गाण्यावर झिंगाट होऊन तराट नाचत होते.
महाबळेश्वरचा प्रसिद्ध भेकवली या गावामधील लिंगमळा धबधबाही पर्यटकांना खुणावत आहेत. याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहे. मुसळधार पाऊस आणि लिंगमळा धबधब्याचे डोंगरावरून पडणारे पांढरे शुभ्र फेसाळलेल्या पाण्यासोबत अनेक पर्यठक ‘सेल्फी’ काढण्यासाठी गर्दी करत होते. सायंकाळी बाजारपेठ गर्दीने बहरुन जात आहेत. (प्रतिनिधी)
कणसांना मागणी वाढली
४महाबळेश्वरचा पाऊस आणि येथील थंड हवेने पर्यटकांच्या अंगात नेमहीच हुडहुडी भरते. या थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी पर्यटकांमधून मक्याच्या कणसांना मोठी मागणी होत आहे. शहरात ठिकठिकाणी कणसांची विक्री करणारे छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कणसांना मागणी वाढल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हुल्लडबाजांना आवरा...
४महाबळेश्वरला भेट देणारे अनेक पर्यटक येथील धबधब्यांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहे. यापैकी काही हुल्लडबाज युवक कशाचीही तमा न बाळगता मराठी, हिंदी गाण्यांवर बेधुंद होऊन धबधब्याच्या ठिकाणी नृत्य करीत आहेत. याचा इतर पर्यटकांना त्रास होत असून, हुल्लडबाज युवकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पावसातही घोडसवारी
४पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेल्या येथील वेण्णा तलावात नौकाविहार बंद करण्यात आले असले तरी पर्यटक घोडसवारीला पसंती देत आहे. दाट धके अन् पावसामधून घोडसवारी करण्याचा आनंद काही औरच असतो, असे पर्यटक आवर्जून सांगत आहेत. पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून घोडसवारी व्यवसाय बंद होता. मात्र, दोन दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Web Title: Tourism's 'Selfie With Waterfall' in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.