महिलेला घटस्फोट घेण्यास भाग पाडून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:37+5:302021-02-05T09:10:37+5:30
सातारा : घटस्फोटित असल्याचे सांगून एका महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार ...

महिलेला घटस्फोट घेण्यास भाग पाडून अत्याचार
सातारा : घटस्फोटित असल्याचे सांगून एका महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पाणीपुरवठा विभागातील निवृत्त अभियंत्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वैजयंता ओतारी आणि मुलगा कुणाल ओतारी यांच्यावर बदनामी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णा रामचंद्र ओतारी (रा. रत्नदीप ट्रेडर, मोळाचा ओढा, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिलेचा १९९९ मध्ये विवाह झाला होता. परंतु, पतीसोबत पटत नसल्याने त्या २००३ मध्ये मुलासह साताऱ्यात आईकडे राहण्यास आल्या. या दरम्यान ओळखीचे असलेले ओतारी त्यांच्या घरी येत होते. त्यांनी ते घटस्फोटित असल्याचे सांगितले होते. २०१७ मध्ये त्यांनी संबंधित पीडित महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. त्यासाठी कागदपत्रे तयार करायला मदत केली. घटस्फोटानंतर त्याने घरी येऊन स्वत:च्या घटस्फोटाची कागदपत्रे आईला दाखवली व तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे, असे सांगितले. संमती मिळाल्यानंतर महिलेला विवाह नोंदणी कार्यालयात नेले. तेथून अर्जही आणला. तो अर्ज भरण्यासाठी ओतारीने महिलेला घरी नेले. त्या ठिकाणी आता लग्नच करणार आहोत म्हणून शारीरिक संबंध केले. त्यानंतर पीडितेने लग्न कधी करणार, असे वारंवार विचारले. तेव्हा माझा मित्र विवाह नोंदणी कार्यालयात आला आहे, तो आपल्याला दाखला देईल, असे सांगून त्याने पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर वारंवार अत्याचार केला. त्यामध्ये पीडित महिला गर्भवती राहिली. त्यानंतर ओतारी याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. लॉकडाऊन काळात विवाह नोंदणी कार्यालय बंद असल्याने पंढरपूर येथे जाऊन लग्न करू, असे ओतारी यांनी सांगितले. त्यानुसार दोघे पंढरपूरला गेले. दरम्यान, तेथे असतानाच महिलेच्या आईचा फोन आला. एक महिला, मुलाला घेऊन घरी आली आहे व तुला शिवीगाळ करत असल्याचे तिने सांगितले. त्याबाबत विचारणा केल्यावर ओतारी याची पत्नी व मुलगा असल्याचे समोर आले. त्यामुळे घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखवून ओतारीने शारीरिक अत्याचार केल्याचे तसेच त्याच्या पत्नी व मुलाने बदनामी केली असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.