टोमॅटोचा दर बनतोय भलताच ‘लालबुंद’

By Admin | Updated: July 30, 2014 23:18 IST2014-07-30T23:06:52+5:302014-07-30T23:18:48+5:30

दर कडाडले : सॅलेडमधूनही हद्दपार; गृहिणी करतायत काटकसरीने वापर

Tomato rates can be made as well as reddish | टोमॅटोचा दर बनतोय भलताच ‘लालबुंद’

टोमॅटोचा दर बनतोय भलताच ‘लालबुंद’

सातारा : स्वयंपाकघरात महिलांच्या अगदी जवळचा आणि ऐनवेळी भाजी म्हणून करता येईल, असा टोमॅटो सध्या सामान्यांवर रुसला आहे. चाळीस रुपये किलो दर असलेला टोमॅटो आता ऐंशी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सामान्यांच्या स्वयंपाक घरातून तो अक्षरश: हद्दपार झाला आहे.
यावर्षी मान्सूनच्या पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे बहुतांश ठिकाणी पीक करपून गेले. महाराष्ट्रात सर्वत्रच कमी अधिक प्रमाणात हीच अवस्था असल्यामुळे यंदा टोमॅटोचे पीक तुलनेने कमी आले. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटोचे दर कडाडल्याचे चित्र दिसत आहे.
जोरदार पाऊस सुरू झाला की टोमॅटोमध्ये अळ्या होण्यास सुरुवात होते. टोमॅटो पिकले की आळ्या होतात, म्हणून शेतकरी कच्चे किंवा अर्धवट पिकलेले टोमॅटो बाजारात विक्रीस आणतात. यातूनच ते काही पैसे कमवतात.
पूर्ण पिकलेल्या टोमॅटोमध्ये काहीवेळा पाणीही होते, त्यामुळे त्यांचा विशिष्ट दर्प येतो. कित्येकदा असे टोमॅटो कापल्यानंतर त्यातून पांढऱ्या अळ्याही बाहेर पडतात. आगामी काही दिवस टोमॅटोचे दर असेच चढे राहणार, असा कयास व्यापारी व्यक्त करत आहेत. बाजारपेठेत जोपर्यंत मुबलक प्रमाणात टोमॅटो उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत ही दरवाढ अशीच राहणार, असे व्यापारी सांगत आहेत.
तूर्त सुज्ञ गृहिणींनी टोमॅटोचा वापर टाळत त्याला पर्याय म्हणून अन्य गोष्टींचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
मांसाहार खाणाऱ्या कुटुंबात श्रावण महिन्यात मांसाहार पूर्ण बंद असल्यामुळे टोमॅटोचा वापर तुलनेने कमी झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tomato rates can be made as well as reddish