दर गडगडल्याने टोमॅटो नाल्यात
By Admin | Updated: November 24, 2014 23:13 IST2014-11-24T21:57:59+5:302014-11-24T23:13:15+5:30
मसूर परिसरातील चित्र : लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने बळीराजा आला अडचणीत

दर गडगडल्याने टोमॅटो नाल्यात
जगन्नाथ कुंभार - मसूर -टोमॅटो पिकाला दर मिळत नसल्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारपेठेतील दर आणि उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे बळीराजा अडचणीत आला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील विक्रीचा दर परवडत नसल्यामुणे टोमॅटो नाल्यात तसेच शेताच्या बाहेर फेकून दिले आहेत.
कऱ्हाड तालुक्यात अनेक ठिकाणी टोमॅटोकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागण केली आहे. मात्र, बाजारपेठत दराची घसरण झाल्यामुळे अनेक शेतकरी आता अडचणीत आले आहेत. उत्पादनाचा खर्चही बाहेर पडत नसल्यामुळे अवघड होऊ बसले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आता तोडणी वाहतूक ही परवडेनासी झाली आहे. कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून टोमॅटोची लागण केली आहे. टोमॅटो पिकाची लागण करण्यापूर्वी शेती तयार करणे, सरी सोडणे, रोपे आणणे अथवा स्वत:च तरू तयार करणे अशी कितीतरी कामे सुरुवातीलाच करावी लागतात. लागण झाल्यानंतर त्यांचे संगोपन करताना विविध प्रकारची खते, औषध फवारणी, मजूरांचा पगार आणि फळे सुरु झाल्यानंतर तारा सोडून बांधणी करणे असा मिळून एकरी येणारा खर्च लाखांच्या घरात आहे. अनेकदा शेतकरी यासाठी कर्ज काढून सर्व खर्च भागवतात. मात्र, आजचा बाजारातील टोमॅटोचा दर लक्षात घेता, बळीराजा अडचणीत आला आहे. यावर्षी चांगले उत्पन्न निघेल या मोठ्या आशेने कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक केले, मात्र त्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.
बळीराजा येतोय मेटाकुटीस...
शेतातून जर टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायचे म्हणले तर येणार खर्च हजारांच्या घरात असतो. तोडणीसाठी मजूर लागतात. त्यांचाही खर्च तितकाच येतो. टोमॅटोची तोडणी केल्यापासून ते अगदी बाजारापर्यंत येणारा खर्च करतानाच बळीराजा मेटाकुटीला येत आहे.
टोमॅटो पिकाला हमीभाव मिळावा म्हणून शेतीविभागाने पावले उचलली पाहिजेत. दरात जर घसरण होत राहिली तर टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे.
- विकास यादव,
शेतकरी