सातारा : पाचगणी, महाबळेश्वरमध्ये येताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याठिकाणी व्यक्ती मोजून प्रतिमाणसी टोल घेतला जातो. तसे न करता वाहनावर टोल आकारावा आणि हा टोल फास्ट टॅगमधून घेतला जावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.पाचगणी-महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीवेळी पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी टोलबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पाचगणी आणि महाबळेश्वर ही जागतिक पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटकांच्या गैरसोयी होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत. पाचगणीतून येताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या पार्किंगचीदेखील मोठी समस्या आहे. त्यासाठी महाबळेश्वरमध्ये एसटी डेपो परिसरात ३०० वाहनांचे पार्किंग करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याबरोबरच येथील कचऱ्याची समस्यादेखील कायमस्वरूपी दूर करण्याचाही प्रयत्न होणार आहे.
पाचगणी-महाबळेश्वरमध्ये माणसांऐवजी वाहनांवर टोल लावणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:44 IST