टोलनाक्यासाठी इंचभरही जमीन देणार नाही
By Admin | Updated: April 22, 2015 00:30 IST2015-04-21T22:50:09+5:302015-04-22T00:30:13+5:30
आनेवाडी ग्रामस्थांची भूमिका : भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या भाडेपट्ट्याच्या कराराची मागणी

टोलनाक्यासाठी इंचभरही जमीन देणार नाही
सायगाव : आनेवाडी टोलनाक्यालगत जमीन संपादनाच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या आणि एकच हाहाकार उडाला. सुमारे ५० हेक्टर शेतजमीन संपादित होणार अशी चर्चा सुरू असतानाच या केवळ वावड्या असून, संपादित होणारी जमीन सोळा ते सतरा गुंठे असल्याचा खुलासा आनेवाडी ग्रामस्थांनी केला आहे. संपादित होणारे क्षेत्र मर्यादित असले, तरी कायमस्वरूपी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा ठाम नकार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी आनेवाडी येथील शेतकऱ्यांना जमीन संपादनाच्या नोटिसा आल्या. संबंधित सर्व्हे नंबरवरील सर्व खातेदारांना या नोटिसा मिळाल्या. त्यामुळे मूळ संपादित करावयाच्या जमिनीव्यतिरिक्त इतर खातेधारकांनाही नोटिसा मिळाल्या. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले. मात्र, क्षेत्र मोठे असो वा छोटे, इंचभरही जागा कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास विरोध असेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. शेती हा आनेवाडी येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय आहे. केवळ जमीन हेच येथील लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. साठ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत. आजवर आरफळ कालवा, धोम डावा कालवा, धोम पुनर्वसन, राष्ट्रीय महामार्ग, टोलनाका अशा विविध कारणांनी जमिनी संपादित झाल्याने शेतीचे क्षेत्र रोडावले आहे. यापुढे कसलाही अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका मुरलीधर शिंदे, दादा पाटील, नामदेव फरांदे, बाळासाहेब पाटील, माणिक फरांदे, श्रीरंग फरांदे, भालचंद्र फरांदे, कृष्णचंद्र फरांदे, सुधीर फरांदे आणि ग्रामस्थांनी घेतली आहे. (वार्ताहर) अशा आहेत मागण्या कायमस्वरूपी जमीन हस्तांतरित करण्यास ठाम नकार भाडेपट्ट्यावर तीस वर्षांसाठी करार करावा करार कालावधी संपल्यानंतर बांधकामासह जमिनी मूळ मालकास परत द्याव्यात भविष्यात रोजगारनिर्मिती झाल्यास भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे संबंधित जमीन टोलनाक्यालगतची असून, विविध सुविधांसाठी ही संपादित करण्याच्या नोटिसा आल्या आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. यासाठी ‘रिलायन्स’चे अधिकारी आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्यासमवेत येत्या २३ तारखेला बैठक बोलावली आहे. या प्रश्नात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. - मुरलीधर शिंदे, ग्रामस्थ, आनेवाडी