३ आमदारांसह २४ उमेदवारांचा आज फैसला

By Admin | Updated: May 7, 2015 00:21 IST2015-05-06T23:29:07+5:302015-05-07T00:21:10+5:30

पैजा लागल्या : कऱ्हाड, खंडाळा, माण, फलटणमध्ये चुरस

Today's decision of 24 candidates, including 3 MLAs | ३ आमदारांसह २४ उमेदवारांचा आज फैसला

३ आमदारांसह २४ उमेदवारांचा आज फैसला

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी आठपासून मतमोजणी होत असून, तीन आमदारांसह २४ उमेदवारांचे भविष्य उलगडले जाणार आहे. काही मतदारसंघांत तुल्यबळ लढती होण्याच्या शक्यतेने पैजा लागल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यासह दक्षिण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत.
सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलविरोधात खासदार उदयनराजे गटाच्या काही समर्थकांनी आव्हान उभे केले होते. सात जणांचे परिवर्तन पॅनेल तयार झाले, तर सात जण स्वतंत्र लढले आहेत. राष्ट्रवादीचे सातारा सोसायटी मतदारसंघातून महाबळेश्वरमधून राजेंद्र राजपुरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खटावमधून आमदार प्रभाकर घार्गे, पाटणमधून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, गृहनिर्माणमधून खासदार उदयनराजे भोसले, खरेदी विक्रीमधून माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, औद्योगिक विणकरमधून अनिल देसाई हे बिनविरोध ठरले होते. कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी अंतिम क्षणी दादाराजे खर्डेकर यांना पाठिंबा दिला. तर महिला राखीवमधील दोन जागांवरील तिढा सुनेत्रा शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे सुटला. कोरेगाव सोसायटीतून माजी संचालक लालासाहेब शिंदे यांचा पाठिंबा मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आल्याने सुनील माने निसटले होते.
जावळी सोसाटीतून शशिकांत शिंदे यांच्याविरोधात दीपक पवार, वाई सोसायटीतून नितीन पाटील यांच्याविरोधात दिनकर शिंदे, फलटणमधून विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध तुकाराम शिंदे, खंडाळ्यातून दत्तानाना ढमाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर बकाजीराव पाटील, कऱ्हाड सोसायटीतून माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याविरोधात धनाजी पाटील, माणमधून आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात माजी आमदार सदाशिवराव पोळ, नागरी बँका व पतसंस्थांमधून राजेश पाटील-वाठारकर यांच्याविरुद्ध प्रभाकर साबळे, अनुसूचित जाती व जमातीमधून प्रकाश बडेकर यांच्याविरोधात सुरेश गायकवाड, बाळासाहेब शिरसट, इतर मागासमधून प्रदीप विधाते विरुद्ध शिवाजी भोसले, भटक्या जाती-जमातीमधून अर्जुन खाडे विरुद्ध अजय धायगुडे-पाटील यांच्यातील सामना रंगला आहे.
मंगळवारी सोसायटी मतदारसंघातील ९५१ मतदारांपैकी ९४२, नागरी बँका व पतसंस्थांमध्ये ४४३ मतदारांपैकी ४४०, खरेदी विक्रीमधील ११ पैकी १०, औद्योगिक विणकरमधील ३९८ पैकी ३६०, कृषी प्रक्रियामधून ३० पैकी ३०, गृहनिर्माणमधील ४३७ पैकी ३७० मतदारांनी मतदान केले. याच मतदानावर राखीव मतदारसंघातील उमेदवारांचेही भविष्य अवलंबून आहे.
दरम्यान, कऱ्हाड, खंडाळा, माण, फलटण या सोसायट्यांमध्ये चुरस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातही अटीतटीची लढत होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात पैजा लागल्या आहेत. जेवणापासून ते रोख रकमांचाही या पैजांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, महिला राखीवमधून कांचन साळुंखे, सुरेखा पाटील यांचा तर कृषी प्रक्रियेतून दादाराजे खर्डेकर, कोरेगाव सोसायटीतून सुनील माने यांचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. (प्रतिनिधी)


पाठिंबा देणाऱ्यांना किती मते पडणार?
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे न घेता मुदत संपल्यावर राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे लालासाहेब शिंदे, आनंदराव शेळके-पाटील, सुनेत्रा शिंदे, बाळासाहेब पाटील हे चार उमेदवार आहेत; परंतु मतपत्रिकेवर त्यांचे नाव आणि निवडणूक चिन्हही असल्याने त्यांना काही मते मिळण्याची शक्यता असून, ती किती असतील? याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Web Title: Today's decision of 24 candidates, including 3 MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.