‘लोकमत’चा आज वर्धापन दिन
By Admin | Updated: May 16, 2016 00:49 IST2016-05-16T00:47:04+5:302016-05-16T00:49:35+5:30
‘राधिका संकुल’मध्ये कार्यक्रम : सायंकाळी मान्यवरांची राहणार उपस्थिती

‘लोकमत’चा आज वर्धापन दिन
सातारा : ‘लोकमत’नं हाक द्यावी अन् सातारकरांनीही या हाकेला ओ देत भरभरून प्रतिसाद द्यावा, हीच आजपर्यंतची परंपरा. यंदाही ‘लोकमत’च्या दहाव्या वर्धापन दिनाच्या ‘ग्लोबल सातारकर’ विशेषांकाला सातारकरांचं उत्कट प्रेम लाभलं. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र येणारच ना! अर्थात निमित्त आहे ‘लोकमत’च्या स्नेहमेळाव्याचं.
जिल्ह्यातील समाजमनाचा आरसा’ असा लौकिक प्राप्त केलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचा दहावा वर्धापनदिन सोमवार, दि. १६ रोजी राधिका चौकातील राधिका सांस्कृतिक संकुल येथे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत थाटामाटात साजरा होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधायक प्रयत्नाचा सन्मान करीत, विजिगीषू वृत्तीच्या प्रत्येक यशस्वी सातारकराच्या नावाचा उद््घोष करीत आणि प्रत्येक विघातक शक्तीवर कठोर प्रहार करीत ‘लोकमत’ची सातारा आवृत्ती अकाराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
जिल्ह्याची परिपूर्णतेकडे वाटचाल व्हावी, हा हेतू ठेवून ‘लोकमत’ने मावळत्या वर्षातही अनेक उपक्रम राबविले.
केवळ बातमी देऊन न थांबता बातमीमागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करून अचूक विश्लेषण सातारकरांसमोर ठेवले. ही विश्लेषणे, भाकिते आणि ठोकताळे अचूक ठरल्याने ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
या शिदोरीच्या जोरावर अकराव्या वर्षात अधिक जोमाने काम करण्यास ‘टीम लोकमत’ सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)