कोरोनामुळे लग्नाला येऊ नका म्हणण्याची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:36+5:302021-04-25T04:38:36+5:30
रशिद शेख औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार ...

कोरोनामुळे लग्नाला येऊ नका म्हणण्याची वेळ!
रशिद शेख
औंध : लग्नसोहळा म्हटले की ग्रामीण भागात प्रत्येक जवळचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत नव्हता; मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, हे आपल्या पै-पाहुणे, मित्रमंडळींना फोन करून सांगत आहेत की लग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्यातच उरकणार आहे. त्यामुळे आता लग्नही बोटावर मोजता येतील अशा लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत, तर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत.
सद्य:स्थितीत गेल्या वर्षीपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये, वाडी-वस्तीमध्ये कोरोना जाऊन पोहोचला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी पन्नास लोकांची परवानगी काढून लग्नसोहळे केले जात होते. त्यावेळी जास्त संसर्ग नसल्याने पन्नासऐवजी दोनशे-तीनशे लोक उपस्थित राहत होते. परंतु, आता प्रशासनाने दोन्हीकडील मिळून २५ लोकांना परवानगी दिली आहे. मात्र, ती परवानगी काढताना उपस्थित २५ लोकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, वय ही माहिती भरणे महत्त्वाचे केले आहे. तसेच आचारी, भटजी यांचे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र व विवाह सोहळा दोन तासांच्या आत पूर्ण करणे या अटी व शर्ती बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.
सध्याची अनिश्चतता, एकूणच कठीण परिस्थिती पाहता कुटुंबीयांसोबत सुरक्षित अंतर ठेवून बोहल्यावर चढण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे, तर संसर्गजन्य परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलावे लागल्यामुळे जोडप्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही आहात तिथे सुरक्षित राहा, आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो, नंतर जोडीने येतील तुमच्याकडे असे निरोप पै-पाहुणे, मित्रमंडळी यांना मिळत आहेत.
(चौकट)
कारवाईपेक्षा कोरोनाची भीती.....
लग्नसोहळ्यामध्ये नियम न पाळल्यास कारवाई होईल, या भीतीपेक्षाही ग्रामीण भागात आता कोरोनाची भीती जास्त असल्याने नियमांचे पालन करूनच लग्नसोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षभरापासून विवाह सोहळ्यातून काही ठिकाणी संसर्ग अधिक बळावला असल्याचेही पाहावयास मिळाले आहे.