यंदा ७१ लाख ‘हिरवे मित्र’ घेणार श्वास!
By Admin | Updated: July 22, 2014 22:51 IST2014-07-22T22:36:12+5:302014-07-22T22:51:28+5:30
जिल्ह्यात सर्वदूर वृक्षारोपण : पावसाअभावी उशिरा लागवड सुरू

यंदा ७१ लाख ‘हिरवे मित्र’ घेणार श्वास!
नितीन काळेल - सातारा
जिल्ह्याच्या पूर्व भागात तुरळक निसर्ग संपदा असली तरी पश्चिम भाग निसर्गसौंदर्याने पुरेपूर भरलेला आहे. जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य वाढावे, गावे, शहरे, रस्ते, वने, जंगल हिरवेगार दिसावे यासाठी यावर्षी जवळपास ७१ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने रोपांची लागवडही उशिरा सुरू झालेली आहे.
पर्यावरणाचे महत्व अबाधित आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे असे सर्वच पातळीवरून आवाहन करण्यात येते. शासनाच्या तर अनेक योजना त्यासाठी आहेत. विविध कार्यक्रमातही रोपे भेट देऊन पर्यावरणाचे महत्च सांगण्यात येते. मात्र, एवढी जागरुकता करुनही वृक्षतोड होतच असते. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंप्रेरणेने वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच आहे ते वृक्ष, जंगल वाचेल व पुन्हा एकदा सर्वत्र हिरवेगार दिसू लागेल.
सातारा जिल्ह्यात एक लाख ६० हजार हेक्टर इतके वनक्षेत्र आहे. एकूण क्षेत्राच्या ते १६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त वनक्षेत्र हे पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यात आहे. यावर्षी वन विभगाच्या वतीने जिल्ह्यात ७१ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागीलवर्षी ८० लाख रोपे लावण्यात आली होती. वनविभागाच्या जिल्ह्यात १२ रोपवाटिका असून त्यामध्ये सध्या १९ लाख रोपे तयार आहेत. त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागाने १० रोपवाटिकेतून तयार केलेली ५ लाख ५ हजार रोपे तयार आहेत. यामध्ये विविध प्रकारची रोपे आहेत. २०१४-१५ या वर्षात या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.