तयार ‘पीच’वर उपऱ्यांच्या ‘बॅटिंग’मुळे तिळपापड

By Admin | Updated: September 25, 2014 00:31 IST2014-09-24T23:23:53+5:302014-09-25T00:31:14+5:30

भाजप-शिवसेना : निष्ठावंत इच्छुकांचा विरोध डावलून आयात उमेदवारांना तिकिटे मिळण्याची धास्ती

Tilapapad due to the above batting of the pitch | तयार ‘पीच’वर उपऱ्यांच्या ‘बॅटिंग’मुळे तिळपापड

तयार ‘पीच’वर उपऱ्यांच्या ‘बॅटिंग’मुळे तिळपापड

सागर गुजर -सातारा  -मोदी लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्यांकडून भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असं ही मंडळी ठणकावून सांगत आहेत. पक्षश्रेष्ठींनीही हवेच्या दिशेबाबतचे ‘होकायंत्र’ अद्याप झाकून ठेवले आहे. अशा वातावरणात दिशाहीन होण्याची वेळ भाजप व शिवसेनेच्या निष्ठांवंतांवर आली आहे. पहिली ‘बॅटिंग’ मिळेल म्हणून ‘पीच’ तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांनाच ‘पॅव्हेलियन’मधील राखीव खेळाडूंत बसून मॅच बघण्याची वेळ यावी, तशी या निष्ठावंताची स्थिती झाली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. आता जावळीतलेच दीपक पवारही भाजपच्या घरात गेलेत. भाजपमध्ये प्रवेश करून पक्ष वाढविण्याच्या अटीवरच त्यांना पक्षात घेतल्याचे श्रेष्ठींनी स्पष्ट केले असले तरी या पुढील निर्णयाचा अंदाज लागत नसल्याने भाजपमधील साताऱ्यातून इच्छुक असणाऱ्या दत्ताजी थोरात व सुवर्णा पाटील यांची कोंडी झाली आहे. हे दोघेही निष्ठांवतांनाच उमेदवारी द्यावी, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, पक्षानं दीपक पवार किंवा सदाशिव सपकाळ या दोघांपैकी कुणालाही उमेदवारी दिली तर थोरात व पाटील यांना पक्षनिष्ठा दाखवावीच लागणार आहे. दीपक पवार व सदाशिव सपकाळ यांनी काँगे्रस व शिवसेनेचा पाहुणचार पूर्वीच घेतला असल्याने पक्षानं निष्ठावंतांना तिकीट दिले तर पवार व सपकाळ यांना सर्व वाटा खुल्याच राहणार आहेत. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय; सोडलं तर पळतंय,’ अशी वेळ निष्ठावंतांवर आली आहे.
महायुतीतून रासप, स्वाभिमानी व शिवसंग्राम हे तिन्ही पक्ष बाहेर पडल्याचे वृत्त बुधवारीच धडकले असल्याने माण-खटाव व वाईची परिस्थिती ‘जैसे थे’ राहील, असे चित्र निर्माण झाले आहे. माण-खटावमधून रासपच्या उमेदवाराविरोधात भाजप कुणाला उभे करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. वाई मतदारसंघ शिवसेनेकडेच राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने मोठ्या आशेने भाजपमध्ये दाखल झालेल्या पुरुषोत्तम जाधवांची कोंडी झाली आहे. याठिकाणी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांचा रस्ता साफ झाल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. माजी आमदार मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांना अद्याप कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. त्यामुळे बावळेकर व मदन भोसले एकत्र येऊन आमदार मकरंद पाटलांचा सामना करणार की बावळेकर, भोसले एकमेकांशी लढून मकरंद पाटलांचा रस्ता साफ करणार, याचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल.

‘वाघां’चे अवसान अन कुपोषणाचा प्रश्न!
वाईतल्या मोजक्या पेठांमध्ये अस्तित्व असणारा भाजप, राष्ट्रवादी अन काँगे्रसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर चालणारे येथील ‘वाघ’ या निवडणुकीत काही प्रमाणात उसने अवसान आणतील; मात्र मुळातच ‘कुपोषणा’चा जो प्रश्न या दोन्ही पक्षांना भेडसावत होता. या प्रश्नाला हद्दपार करण्यात युतीच्या श्रेष्ठींनाच यश आलेले नाही. त्यामुळे साहजिकच बावळेकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यांचा सामना तालुक्यात धष्ट-पुष्ट झालेल्या राष्ट्रवादीशी होणार आहे.

Web Title: Tilapapad due to the above batting of the pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.