तिकीट काढलंय?... मग ढकला एसटी!

By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:24:13+5:302015-11-04T00:08:25+5:30

कऱ्हाड आगाराची स्थिती : बसस्थानकातील गाड्यांना चढला गंज; सुविधांकडे दुर्लक्ष; ठोस उपाययोजनेची गरज

Tickets? ... then Dhakal ST! | तिकीट काढलंय?... मग ढकला एसटी!

तिकीट काढलंय?... मग ढकला एसटी!

कऱ्हाड : येथील बसस्थानक प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आगार व्यवस्थापनाबाबत विद्यार्थी व नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वेळेवर एसटी येत नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. विशेष म्हणजे या बसस्थानकातील मोठ्या प्रमाणात गाड्या या नादुरुस्त असल्याने त्यांची अवस्था असून, अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. दुरुस्तीअभावी पडून राहिल्यालेल्या गाड्यांमुळे ड्युटीसाठी गाडी नसल्याने चालक, वाहकांना ड्युटीसाठी वेटिंगलिस्टमध्ये थांबावे लागत आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी या ना त्या कारणाने वारंवार चर्चेत असते. सध्या आगाराचे काम सुरू जरी झाले असले तरी या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आगारातील मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, चुकीच्या वेळेत फलाटावर लागणाऱ्या गाड्या तसेच गाड्यांची दुरावस्था अशा प्रकारामुळे आगारात येणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानकातील गाड्या नादुरुस्त असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांसह आता चालक, वाहकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. ड्युटी नसेल तर दिवसाला पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातल्या फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. कऱ्हाड आगारात ९० हून अधिक बसेस आहेत. त्यातीलही काही गाड्या नादुरुस्तावस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एखादी गाडी गेल्यास ती बंद पडली की, तिला धक्का मारून तसेच दुरुस्त क रून पुन्हा सुरू करावी लागते.
कऱ्हाड आगारातील गाड्याची अवस्था इतकी वाईट आहे की, काही गाडीला खिडक्या आहेत मात्र, काचा नाहीत. काही गाड्यांमधील बाकड्यांची अवस्था गंभीर बनली आहे. बसस्थानकातही सुविधांची वाणवा आहे. प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची टाकी नसल्याने सध्या प्रवासी व विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एसटी आगाराबाहेर जावे लागत आहे. अशात आगारात मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी व प्रवासी त्यामध्ये पडून त्यांचा अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. आगार व्यवस्थापकांकडून विद्यार्थी व प्रवाशांच्या गैरसोयी लक्षात घेऊन संबंधीत बांधकाम ठेकेदाराला आगारातील खड्डे मुजवून चांगला रस्ता तयार करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)


आगाराला ५२ वर्षे पूर्ण
एस. टी. महामंडळाला मोठे उत्पन्न मिळवून देणारे कऱ्हाड आगार आहे. १९६२ मध्ये बांधण्यात आलेल्या कऱ्हाड एसटी आगाराला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आगाराचे सध्या बांधकाम विभागाकडून नुतनीकरण केले जात आहे. या आगारामधून दररोज १६०० बसेस ये-जा होत असते.


नुतनीकरणासाठी ११ कोटी निधी मंजूर
मुख्यमंत्रीपदी असताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निधीतून आगाराच्या नुतनीकरणासाठी ११ कोटी निधी मंजूर केला आहे.

Web Title: Tickets? ... then Dhakal ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.