पॅरामोटर्सचा थरार; कवायतींचा कलाविष्कार
By Admin | Updated: December 16, 2014 23:38 IST2014-12-16T22:27:40+5:302014-12-16T23:38:37+5:30
कऱ्हाडमध्ये विजय दिवस : ‘अॅरोमॉडेलिंग’ला उपस्थितांची दाद, सैनिकी सामर्थ्याचे अनोखे दर्शन

पॅरामोटर्सचा थरार; कवायतींचा कलाविष्कार
कऱ्हाड : कऱ्हाडला सतराव्या विजय दिवसाचा थरार मंगळवारी शिगेला पोहोचला. आकाशाला गवसणी घालणारी पॅरामोटर्सची प्रात्यक्षिके, काळजाचा ठोका चुकवणारी अॅरोमॉडेलिंग, चकीत करणारी मल्लखांब कला व शेकडो विद्यार्थिनींमधील नृत्यकवायतीची सुसूत्रता आदींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले़ छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या या सोहळ्यामुळे उपस्थित हजारो कऱ्हाडकरांना सैनिकी, पोलिसी सामर्थ्याबरोबरच सांस्कृतिक दर्शन अनुभवावयास मिळाले.
सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, कर्नल संभाजी पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विजय ज्योतीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना संचलनाने मानवंदना देण्यात आली. गायक भारत बलवल्ली, राज्य राखीव दलाचे प्लॅटून, सातारा पोलीस दलाचे जवान व बँड, मराठा लाईट इन्फंर्ट्रीचे जवान व बॅण्ड, लाहोटी कन्या शाळेचे नृत्यपथकातील ४०० विद्यार्थिनी संचलनात सहभागी झाल्या होत्या.
छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर मंगळवारी विजय दिवस समारोहाचा मुख्य सोहळा झाला़ या सोहळ्यासाठी कऱ्हाडसह अनेक तालुक्यांतील हजारो नागरीक उपस्थित होते़ विविध खात्यांचे अधिकारी, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, युवक-युवती यासह ज्येष्ठ नागरीकांनीही या सोहळ्याला आवर्जुन हजेरी लावली़ स्टेडीयमचा प्रत्येक कोपरा गर्दीने फुलून गेला होता़ सोहळ्याच्या सुरूवातीला राष्ट्रभक्तीपर गीते सादर करण्यात आली़ पॅरामोटर्सधारी जवानांना आकाशात तरंगताना पाहिल्यानंतर नागरीकांच्या काळजाचा ठोका चुकला़ पॅरामोटर्सधारी जवान एकापाठोपाठ अचुकरीत्या स्टेडीयमवर उतरले़ त्यावेळी नागरीकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले़ बेळगावच्या एम़ एल़ आय़ च्या जवानांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. उंब्रज येथील बबन कुंभार या युवकाने मोटारसायकल स्टंट सादर करताना डेअरडेव्हील्स स्टंट्सची आठवण करुन दिली. बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी झांझपथक सादर केले. बालगोपाळांनी एरोमॉडेलिंगमधील रिमोटद्वारे उडणाऱ्या छोट्या हेलिकॉप्टर व विमानांच्या प्रात्याक्षिकांना सर्वाधिक दाद दिली. बँडवरील राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)