सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून सलग चौथ्या दिवशी सातारा शहरासह परिसरात मेघगर्जनेसह हजेरी लावली. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तर जावळी तालुक्यातही विजांच्या कडकडाटात जोरदार वाऱ्यासह वळीव बरसला. यामध्ये गहू आणि ज्वारी पिकाचे नुकसान झाले तसेच झाडेही उन्मळली. तर सातारा तालुक्यातील सज्जनगड परिसरात गारा पडल्या.जिल्ह्यात सोमवारपासून वळवाचा पाऊस कोठे ना कोठे पडत आहे. सुरूवातीला जोरदार वाऱ्यासह कऱ्हाड, पाटण तालुक्यात वळवाने हजेरी लावली. यामध्ये घरे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच माण तालुक्यात पावसामुळे आंबा बागेसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी चौश्या दिवशीही सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला.साताऱ्यात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारासच अंधारुन आले होते. त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता. या पावसातच शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी पाचच्या सुमारासच वीजपुरवठा सुरळीत झाला. तर या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे ऊन आणि उकाडाही कमी झाला आहे.जावळी तालुक्यातील हुमगाव परिसरात गुरूवारी सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वादळासह वळीवाने हजेरी लावली. यावेळी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरूच होता. जोरदार वाऱ्यामुळे काढणीस आलेली ज्वारी भुईसपाट झाली, तसेच गहू पिकाचेही नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पावसामुळे चिखल झाल्याने शेतीची कामेही लांबणीवर पडणार आहेत. तर वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळली, फांद्या तुटल्या आहेत. पश्चिम भागातील सज्जनगड परिसरातही चांगला पाऊस झाला. यावेळी गाराही पडल्या.
सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मेघगर्जनेसह वळवाचा तडाखा; पिकांचे नुकसान
By नितीन काळेल | Updated: April 3, 2025 18:28 IST