चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:45 IST2016-03-06T00:45:21+5:302016-03-06T00:45:21+5:30
सांगलीत भरदिवसा पाच फ्लॅट फोडले; तीन लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांचा धुमाकूळ
सांगली : शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी भरदिवसा चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच फ्लॅट फोडले. सात तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व पूजेचे साहित्य, ७५ हजारांची रोकड असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. दुपारी साडेबारा ते साडेतीन या वेळेत चोरीच्या या घटना घडल्या. ‘चेनस्नॅचिंग’चे गुन्हे रोखण्यासाठी केवळ सायंकाळनंतर शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना चोरट्यांनी चकवा दिला आहे.
मुख्य बसस्थानकामागे पत्रकारनगरमधील ‘शिवक्लासिक’ अपार्टमेंटमधील रचना गणेश तकटे पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांचे कुटुंब दुपारी साडेबारा वाजता घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याचे कानातील टॉप्स् लंपास केले. त्यांच्याच शेजारी डॉ. भारती अशोक डिग्रजे व नरेंद्र राजेंद्र शिंदे राहतात. तेही कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांचेही फ्लॅट फोडले. डॉ. डिग्रजे यांच्या घरातील साहित्य विस्कटून टाकले, पण हाती काहीच लागले नाही. शिंदे यांच्या घरातून पाच हजाराची रोकड, चांदीची समई व पैंजण लंपास केले. दुपारी दीड वाजता ही तिन्ही कुटुंबं घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. विश्रामबाग हद्दीत नेमिनाथनगरमध्ये ‘नंदन’अपार्टमेंट आहे. यामध्ये श्रीधर अशोक धिरडे हे दुसऱ्या मजल्यावर राहतात. दुपारी दीड वाजता धिरडे कुटुंब कामानिमित्त घराबाहेर पडले होते. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडले. त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील दोन मंगळसूत्र, दोन अंगठ्या असे पाच तोळ्याचे दागिने व सत्तर हजारांची रोकड लंपास केली. दुपारी साडेतीन वाजता धिरडे घरी परल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. धिरडे यांच्या शेजारी कुलकर्णी कुटुंब राहते.
हे कुटुंब शनिवारी दुपारी पुण्याला जाण्यासाठी गेले होते. त्यांचाही चोरट्यांनी फ्लॅट फोडला. आतील साहित्य विस्कटून टाकले. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
शेजाऱ्यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. ते साताऱ्यापर्यंत गेले होते. परंतु तातडीने पुन्हा सांगलीला आले. रात्री उशिरा या घटनांची शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली.
गाढ झोप अन् चोरट्यांचा वावर
कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगरमध्ये चोरट्यांनी गुरुवारी रात्री धुमाकूळ घातला होता. याठिकाणी लोकांनी एक श्वान पाळले आहे. पण चोरट्यांनी श्वानाला खायला घालून त्यास शांत बसविले होते. चोरट्यांनी लोक घरात झोपले असताना तीन घरे फोडली. एका घरात चार खोल्यांमध्ये चोरटे निवांत फिरले. तरीही लोकांना जाग आली नाही. एका खोलीत चौघेजण मच्छरदाणी लाऊन झोपले होते. त्यांच्या अंगावर दागिने आहेत का नाही, याची खात्री करण्यासाठी चोरट्यांनी मच्छरदाणी फाडली; तरीही झोपलेल्या लोकांना जाग आली नाही.
श्वान घुटमळले
चोरट्यांचा माग काढण्यासाठी शिवक्लासिक अपार्टमेंटमध्ये श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. लोकमान्य कॉलनी व नंदन अपार्टमेंटमध्येही श्वान घुटमळले. या दोन्ही अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीत एकच चोरट्यांची टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
पुन्हा भरदिवसा
‘चेनस्नॅचिंग’चे गुन्हे पहाटे व सायंकाळी घडत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून या वेळेतच पोलिसांची शहरात गस्त सुरू असते. संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा पाच फ्लॅट फोडून पोलिसांना चांगलाच हादरा दिला आहे. चार वर्षांपूर्वीही शहर व विश्रामबाग हद्दीत भरदिवसा आठ फ्लॅट फोडले होते. दोन वर्षापूर्वीही असाच प्रकार घडला होता.