पाण्याच्या टाकीत बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:13+5:302021-02-05T09:11:13+5:30
लोणंद : लोणंद एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या शंकर राठोड यांची तीन वर्षांची मुलगी गुरुवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाण्याच्या टाकीत ...

पाण्याच्या टाकीत बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
लोणंद : लोणंद एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या शंकर राठोड यांची तीन वर्षांची मुलगी गुरुवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाण्याच्या टाकीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. प्रिया शंकर राठोड असे मृत मुलीचे नाव आहे. याबाबत लोणंद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवार (दि. २८) रोजी लोणंद येथे एमआयडीसी भागामध्ये राहणारे शंकर पोमन राठोड (वय २५, मूळ गाव पितानायकतांडा, ता. देवदुर्ग, जि. रायचूर, कर्नाटक) हे लोणंदमध्ये इमारतीचे गवंडी काम करण्यासाठी गेले होते. घरात तीन वर्षांची प्रिया व शंकर राठोड यांची लहान बहीण होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या लहान बहिणीने प्रिया कोठेही दिसत नाही म्हणून शंकर राठोड यांच्या कामावर आली. त्यानंतर त्यांची पत्नी व त्यांनी शोधाशोध सुरू केली असता घराजवळच असणाऱ्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत प्रिया (वय ३ वर्षे) या बालिकेचा मृतदेह आढळून आला. तिला तत्काळ लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले असून अकस्मात मृत्यूची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला झाली आहे. अधिक तपास लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस फौजदार डी.आर. पाडवी करीत आहेत.