एसटीतून तीन विद्यार्थी रस्त्यावर कोसळले
By Admin | Updated: November 28, 2014 00:10 IST2014-11-27T22:24:05+5:302014-11-28T00:10:07+5:30
कऱ्हाड: धक्काबक्कीतून घडला प्रकार

एसटीतून तीन विद्यार्थी रस्त्यावर कोसळले
कऱ्हाड : एस. टी. मध्ये चढताना गर्दीत धक्काबुक्की होऊन तीन शाळकरी मुले जमिनीवर कोसळली. त्यामध्ये एका मुलाला गंभीर दुखापत झाली असून, उपचारार्थ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील बसस्थानकात गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अभिषेक दीपक घाडगे (वय १३, रा. म्होप्रे, ता. कऱ्हाड) असे जखमी मुलाचे नाव आहे. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील अभिषेक घाडगे हा मुलगा शहरातील यशवंत हायस्कूलमध्ये शिक्षण घेतो.
गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तो गावी म्होप्रेला जाण्यासाठी बसस्थानकात आला. याचवेळी सर्व महाविद्यालये व शाळा सुटल्यामुळे बसस्थानकात गर्दी होती. अभिषेक एस.टी. ची वाट पाहत पाटण फलाटावर थांबला होता. काही वेळानंतर पाटणला जाणारी एस. टी. फलाटावर आली. त्यावेळी एस.टी.बसमध्ये चढण्यासाठी शाळकरी मुलांसह प्रवाशांची झुंबड उडाली.
धक्काबुक्की सुरू असताना प्रवाशांसह काही शाळकरी मुले जमिनीवर कोसळली. त्यामध्ये अभिषेक एस.टी. च्या चाकाजवळ पडल्याने त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच एस.टी. च्या चालक, वाहकासह प्रवाशांनी अभिषेकला उपचारार्थ तत्काळ रुग्णालयात हलविले.
अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. पोलीस हवालदार राजे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)