कऱ्हाड : एसटी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. डी. बी. पतंगे यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली.संजय हरिबा पाटील (वय ४२, रा. चाफोली रोड, पाटण, मूळ रा. कळकेवाडी, ता. पाटण), कृष्णा सखाराम पाटील (वय ३२, रा. कळकेवाडी), सुरेश आनंदा पाटील (वय ५२, रा. चाफोली रोड, पाटण) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चिपळूणहून मिरजकडे जाणारी एसटी घेऊन ६ सप्टेंबर २०१९ रोजी चालक विकास तुकाराम जाधव (रा. गुरसाळे, ता. खटाव) हे पाटणमार्गे कऱ्हाडकडे येत होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एसटी येराड गावच्या हद्दीत पोहोचली असताना पाठीमागून आलेल्या तिघांनी कार आडवी लावून एसटी थांबवली. त्यावेळी एसटी चालक विकास जाधव यांनी कारचालकाला गाडी व्यवस्थित चालव, अपघात होईल, असे सांगितले. त्यावरून चिडून जाऊन आरोपी संजय पाटील, कृष्णा पाटील, सुरेश पाटील या तिघांनी एसटीत चढून चालक विकास जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करीत हाताने मारहाण केली. त्यामध्ये चालक जाधव यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले.याबाबत चालक विकास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावास तसेच दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत भिंगारदेवे यांनी सहकार्य केले.
तेरा साक्षीदार तपासलेया खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांनी या खटल्यात सरकार पक्षाकडून तेरा साक्षीदार तपासले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर. डी. परमाज यांनी या खटल्यातील शिक्षेवर युक्तिवाद केला. तपासी अंमलदार, एसटी चालक, वाहक, पंच तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.