साताऱ्याचे तीन साईभक्त ठार
By Admin | Updated: February 2, 2015 00:03 IST2015-02-01T22:55:14+5:302015-02-02T00:03:17+5:30
सहा जण जखमी : शिर्डीजवळ कार झाडावर आदळून दुर्घटना

साताऱ्याचे तीन साईभक्त ठार
शिर्डी : साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले़ ही घटना रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिर्डी-नाशिक रस्त्यावरील सावळेविहीर शिवारात घडली. हे सर्वजण मुळचे साताऱ्याचे असून मुंबईत कामधंदा करणारे आहेत़या अपघातात रमेश भागुजी जगताप (वय ४४), रमेश बाबूराव यादव (वय २५) व गाडीचा चालक कृष्णा विष्णू जगताप (वय ३०) यांचा मृत्यू झाला़ हे सर्वजण मूळचे अंबावणी (ता. पाटण, जिल्हा सातारा) येथील आहेत़ अपघातात संजय बाजीराव चव्हाण, कल्पेश कान्हू खळे, सचिन सुरेश जगताप, विजय रामचंद्र जगताप, सुरेश लक्ष्मण साळुंके व विश्वास लक्ष्मण सपकाळ हे जखमी झाले़ परिसरतील रहिवाशांनी जखमींना तातडीने साईसंस्थानच्या रूग्णालयात दाखल केले़यातील काहींना नाशिक व मुंबई येथे हलवण्यात आले आहे़ हे सर्वजण एकमेकांचे मित्र व नातेवाईक असून, सध्या मुंबईतील यशवंतनगर (गोरेगाव, पश्चिम) येथे राहतात. काल रात्री दहाच्या सुमारास हे सर्वजण क्वालीस (एम.एच.-०४-पी.डब्ल्यू.-१५१४) गाडीने साईदर्शनासाठी निघाले होते़ पहाटे सहाच्या सुमारास चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड पडून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयुब शेख पुढील तपास करीत आहेत़
(तालुका प्रतिनिधी)