वळणाने घेतला तिघांचा बळी
By Admin | Updated: May 9, 2017 23:31 IST2017-05-09T23:31:11+5:302017-05-09T23:31:11+5:30
वळणाने घेतला तिघांचा बळी

वळणाने घेतला तिघांचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
शामगाव : कऱ्हाड-पुसेसावळी मार्गावरील शामगाव घाटात धोकादायक वळणावर पिकअप जीप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन पिता-पुत्रासह तिघे ठार झाले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला.
प्रभाकर विष्णू कुंभार (वय ४०), त्यांचा मुलगा प्रवण प्रभाकर कुंभार (वय १०) व मित्र अहमद मैनुद्दीन झारी (वय १९, तिघेही रा. खटाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात ठार झालेले प्रभाकर कुंभार हे सैन्य दलामध्ये सेवेत होते. येत्या दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यापुर्वीच काळाने त्यांच्यासह मुलगा व मित्रावर घाला घातला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खटाव येथील प्रभाकर कुंभार हे काही दिवसांपुर्वी गावी आले होते. सोमवारी कामानिमित्त ते मुलगा प्रणव व मित्र अहमद यांना घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच ११ एए ३६२८) कऱ्हाडला आले. काम आटोपून ते रात्री परत खटावला निघाले होते. ते शामगाव घाटात प्राचिन शिव मंदिराजवळील वळणावर पोहोचले असताना समोरून आलेल्या पिकअप जीपची (क्र. एमएच ११ टी ७१२५) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. संबंधित पिकअप जीपमध्ये कामगार होते.
शामगाव येथे वीज खांब उभारण्यासाठी ते आले होते. काम आटोपून परत जात असताना पहिल्याच वळणावर ही दुर्घटना घडली. अपघात होताच जीपच्या चालकाने तेथून पोबारा केला. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी प्रभाकर व प्रणव यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर मैनुद्दीन गंभीर जखमी होता. मात्र, उपचारापुर्वीच त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची नोंद मसूर पोलिस दुरक्षेत्रात झाली आहे.