अहिरेश्वर शाळेतील तीन खेळाडंूची व्हॉलीबॉल राज्य संघात मुसंडी
By Admin | Updated: October 9, 2015 21:08 IST2015-10-09T21:08:35+5:302015-10-09T21:08:35+5:30
जिद्दीचे फळ : खंडाळा तालुक्याच्या वैभवात घातली भर

अहिरेश्वर शाळेतील तीन खेळाडंूची व्हॉलीबॉल राज्य संघात मुसंडी
खंडाळा : प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे... प्रचंड जिद्द आणि अविरत प्रयत्नांच्या जोरावर कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना आणि कोणतीही आधुनिक मैदान नसतानाही अहिरेश्वर विद्यालयातील अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हॉलीबॉल स्पर्धेत राज्यपातळीवर उडी घेतली आहे. या शाळेतील तीन विद्यार्थ्यांची राज्याच्या संघात खेळण्याची संधी मिळणार आहे.खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील अहिरेश्वर विद्यालयात शिकत असणारे सुशील धायगुडे व ऋतुजा धायगुडे या दोघांची १४ वर्षे वयोगटातील संघात तर हृषीकेश राऊत याची १६ वर्षे वयोगटातील संघात राज्यपातळीवर निवड झाली आहे. त्यामुळे यांना कागल आणि वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्पर्धेत खेळता येणार आहे. शालेय वेळेव्यतिरिक्त अधिकच वेळ देऊन या विद्यार्थ्यांनी सराव केला. त्यांना क्रीडाशिक्षक जितेंद्र गाढवे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातही मुलांमध्ये असलेली क्षमता याद्वारे सिद्ध झाली आहे.या यशाबद्दल खंडाळा विभाग शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरराव गाढवे, सचिव अनिरुद्ध गाढवे, प्राचार्य डी. एन. शिरावळे, पर्यवेक्षक के. एल. आवारे यांसह ग्रामस्थांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील मुलांमध्येही विविध खेळांचे सुप्त गुण आहेत. त्यांचा शोध घेऊन योग्य मार्गदर्शन केले तर त्यांचे भवितव्य उज्ज्वल घडू शकते. देशपातळीवरही ही मुले आपली क्षमता सिद्ध करू शकतात. खेळासाठी साधनसामुग्रीही उपलब्ध झाली पाहिजे.
- जितेंद्र गाढवे, क्रीडाशिक्षक