साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’
By Admin | Updated: September 11, 2016 23:48 IST2016-09-11T23:48:50+5:302016-09-11T23:48:50+5:30
देशातला पहिलाच प्रयोग भिलारमध्ये : वाचक चळवळ उभारण्यासाठी घरांमध्ये ग्रंथालय, समितीकडून जागेची पाहणी

साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’
पाचगणी : स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ यारूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध होणार आहे. देशातील हा पहिला प्रकल्प असल्याने महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावणार आहे. या प्रकल्पातून भिलारमध्ये वाचक चळवळ उभी राहून बौद्धिक विकासाबरोबरच आर्थिक उन्नतीही होणार आहे. तब्बल साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’ वसणार असून, यासाठी जागेचीही प्राथमिक निश्चिती करण्यात आली असून, समितीकडून गावातील ५० घरांची पाहणी करण्यात आली आहे.
महाबळेश्वरजवळचे भिलार हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील.
तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची हजार पुस्तके ठेवली जाणार असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले जाणार आहे. इंग्लंडमधील ‘हे आॅन वे’ याच्या धर्तीवर असे गाव विकसित करण्याची ही योजना आहे. त्याबाबत नेमलेल्या उपसमितीकडून कामांचा आढावा घेतला जात आहे.
शासनाच्या वतीने या योजनेसाठी भिलार या गावाची निवड केली आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे महाबळेश्वर तालुक्यासह जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. गावकऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले असून, ही योजना यशस्वी करण्याचा निर्धारही केला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे भिलार हे गाव पर्यटनस्थळ व स्ट्रॉबेरीलॅण्डसह आता पुस्तकांचे गाव म्हणूनही ओळखले जाणार आहे. (वार्ताहर)
प्रकल्पाची अशी आहेत वैशिष्ट्ये...
साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागांवर (उदा : ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.)
घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्र्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर होणार आहे.
या प्रकल्पासाठी देशपातळीवरून भिलार या गावाची प्राधान्याने निवड केल्याने तो आमच्या गावाचा गौरव म्हणावा लागेल. आता ही जबाबदारी शासनाची नव्हे तर आम्हा गावकऱ्यांची आहे. या प्रकल्पास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू आणि हा प्रकल्प यशस्वी करून दाखवू.
- बाळासाहेब भिलारे,
जिल्हा परिषद सदस्य