कारमध्ये तीन लाखांची रोकड
By Admin | Updated: September 29, 2014 00:50 IST2014-09-29T00:50:15+5:302014-09-29T00:50:15+5:30
कोरेगाव प्रांतांकडून जप्त : पुरावे देण्यासाठी एक दिवसाचा अवधी

कारमध्ये तीन लाखांची रोकड
कोरेगाव : पुण्याहून मायणी (ता. खटाव) येथे तीन लाख रुपयांची रोकड घेऊन जाणारी कार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाने आज, रविवारी दुपारी पकडली. कारमधील संबंधित व्यक्तींना रोख रकमेबाबत पुरावे देता आले नाहीत, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ. संजय कुंडेटकर यांनी ती तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. संबंधितांना रोकडबाबत पुरावे आणि स्पष्टीकरण देण्यासाठी उद्या, सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रांत डॉ. कुंडेटकर यांनी मतदारसंघामध्ये विविध भरारी पथके तैनात केली आहेत, त्यापैकी एक भरारी पथक सातारा-रहिमतपूर रस्त्यावर वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी सातारा बाजूने भरधाव आलेली कार पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने अडवली. तिची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन लाखांची रोकड आढळून आली. या कारमधील चौघेजण दिल्ली परिसरातील रहिवासी असून, ते दिल्लीतून विमानाने पुण्यात आले होते, तेथून भाड्याने कार घेऊन ते मायणी येथील एका शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी चालले होते. त्यांच्याकडे आढळलेल्या रकमेबाबत त्यांना स्पष्टीकरण देता आले नाही, त्यांनी सर्वोच्च न्यायालाच्या काही निवाड्यांची कागदपत्रांची सत्यप्रत दाखविली; मात्र रविवार असल्याने बँका बंद आहेत, आम्हाला मुदत द्या, आम्ही पुरावे देतो, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रांत कार्यालयात आणले. डॉ. कुंडेटकर यांनी तात्पुरत्या स्वरूपात ही रक्कम जप्त केली आहे. संबंधितांना रोकडबाबत पुरावे आणि स्पष्टीकरण देण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.