इमारत कोसळून तीन जखमी; एक गंभीर

By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:32:34+5:302015-07-22T00:34:41+5:30

तेराजण बचावले : मलकापूरच्या कोयना वसाहतीतील घटना

Three injured in building collapse; A serious | इमारत कोसळून तीन जखमी; एक गंभीर

इमारत कोसळून तीन जखमी; एक गंभीर

मलकापूर : जुन्या इमारतीवर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना स्लॅबसह संपूर्ण इमारत कोसळून तीन कामगार जखमी झाले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. ही दुर्घटना कोयना वसाहत (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
मुमताज मौला मुल्ला (वय ३०, रा. सूर्यवंशी मळा, बाराडबरी वस्ती, कऱ्हाड) असे जखमी महिलेचे नाव आहे. मुत्ताप्पा व पवार काकी (संपूर्ण नावे पोलिसांना समजू शकली नाहीत.) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना वसाहतीत अर्बन बझारसमोर गंगाधर अनंत जकाते यांच्या मालकीचे जुने घर आहे. जकाते यांनी सुमारे ७०० स्क्वेअर फुटांचे २० वर्षांपूर्वी लोड बेअरिंगचे घर बांधले होते. त्यात मुलगा अशोक, सून ज्योती, नातू अभिलाष व अंकिता असा परिवार वास्तव्यास आहे. त्यांचा कोयना औद्योगिक वसाहतीत फर्निचर बनविण्याचा कारखाना आहे. अशोक जकाते हे कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत.
जकाते यांनी एक महिन्यापूर्वी लोड बेअरिंग करून जुन्या घरावरच दुसरा मजला चढविण्याचे काम सुरू केले होते. लोखंडी अँगलच्या साह्याने साचा उभा करून पहिल्या मजल्याचा स्लॅबही टाकला होता. सध्या भिंतीचा गिलावा करण्याचे व दुसऱ्या मजल्यावर बांधकाम करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी चार महिलांसह दहा कामगार काम करीत होते. नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता कामास सुरुवात केली. पावणेबाराच्या सुमारास गंगाधर जकाते हे टी. व्ही. पाहात बसले होते. नात अंकिता स्वयंपाकघरात होती. मुलगा अशोक बांधकाम कामगारांना सूचना करत होता. त्याचवेळी भिंती हादरल्यासारखे व भिंतीचा काही भाग पडत असल्याचे जाणवले. त्यामुळे अशोक यांनी गॅस व टीव्ही बंद करून वडील व मुलीला बाहेर काढले. कामगारांनाही हाका मारल्या.
वरच्या मजल्यावर काम करणारे ५ कामगार तातडीने खाली आले तर गिलावा करणारे मुल्ला दाम्पत्य मुत्ताप्पा व पवार मावशी यांनी दुर्लक्ष केले. ओरडत असतानाच इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच कोयना वसाहतीमधील ग्रामस्थ, युवकांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्यास सुरुवात केली.
तोपर्यंत पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. युवक, ग्रामस्थ, अग्निशामक दलाच्या जवानांनी बे्रकरने व कटरच्या साह्याने स्लॅब तोडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेची सुटका केली व तातडीने त्या महिलेस उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात पाठवून दिले. तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, ग्रामसेवक व तलाठ्यांनी घटनास्थळी भेट दिली. (प्रतिनिधी)
घाबरल्याने अडकून पडल्या !
यावेळी मुल्ला दाम्पत्य पत्रा व स्लॅबच्या पोकळीत ढिगाऱ्याखाली अडकले, तर मुत्ताप्पा व पवार मावशी पोकळीतून बाहेर पडले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मौला मुल्लाही पोकळीतून बाहेर पडला. मात्र, मुमताज मुल्ला या घाबरल्याने व विटा, सिमेंटचा थर साचल्याने तेथेच अडकून पडल्या.
इमारत जमीनदोस्त झाली, त्यावेळी एक कामगार दाम्पत्य भिंतींना गिलावा देण्याचे काम करीत होते. इमारत कोसळताच या दाम्पत्यापैकी पती स्वत:हून सुखरूप बाहेर पडला. मात्र, पत्नी ढिगाऱ्याखाली पोकळीत अडकली. प्रशासनाच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत घरमालकाच्या कुटुंबीयांसह १३ जण सुखरूप बचावले.

Web Title: Three injured in building collapse; A serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.