ऑक्सिजन बेडअभावी तीन वृद्धांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:33+5:302021-05-03T04:33:33+5:30
तळबीडला दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गत दोन महिन्यांत येथे तीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी सध्या ...

ऑक्सिजन बेडअभावी तीन वृद्धांचा मृत्यू
तळबीडला दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गत दोन महिन्यांत येथे तीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी सध्या येथे १९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५ रुग्ण हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित १४ घरीच उपचार घेत आहेत. शुक्रवारी गावातील पेठ विभागातील दोन व चव्हाण वस्ती परिसरातील एक अशा एकूण तीन वयोवृध्द महिलांना बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर कऱ्हाड पालिकेच्या वतीने कऱ्हाडच्या कोरोना रुग्णांसाठीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेने तळबीड परिसर हादरला आहे.
तळबीड गावातील कोरोना स्थिती आटोक्यात यावी, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थ विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र तरीही गावातील परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याने ते पुरतेच हतबल झाले आहेत. शनिवारपासून गावच्या सीमा बंद करुन संपूर्ण गाव लॉक करण्यात आले आहे.
- चौकट
हेल्पलाईनही ठरतेय कुचकामी
शुक्रवारी मृत्यू झालेल्या वृद्ध महिलांना बेड मिळावा व त्यांच्यावर रुग्णालयात योग्य ते उपचार व्हावेत यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या हेल्पलाईनवरील क्रमांकासह शासकीय व खासगी रुग्णालय यंत्रणेकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वेळेत कोठेही बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे त्या तीन वयोवृद्ध महिलांना आपला जीव गमवावा लागला.
फोटो : ०२केआरडी०२
कॅप्शन : तळबीड, ता. कऱ्हाड येथे कोरोना स्थिती आटोक्यात यावी यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग प्रत्येक घरी सर्व्हे करुन विविध उपाययोजना करत आहे.