श्यामगाव घाटातील भीषण अपघातात तिघे ठार
By Admin | Updated: May 9, 2017 11:15 IST2017-05-09T11:15:47+5:302017-05-09T11:15:47+5:30
मृतात जवानासह, लहान मुलाचा समावेश

श्यामगाव घाटातील भीषण अपघातात तिघे ठार
आॅनलाईन लोकमत
खटाव (जि. सातारा) , दि. ९ : सातारा जिल्ह्यातील शामगाव घाटात सोमवारी मध्यरात्री बलोरो पीकअप व्हॅनने समोरुन दिलेल्या जोरदार धडकेत खटाव येथील दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. यामध्ये आठ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
पॅरामिलिट्रीमध्ये कार्यरत असलेले खटाव येथील जवान प्रभाकर विष्णु कुंभार हे सुटीवर गावी आले होते. अवघ्या दोन महिन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर पुढे काय करायचे याचे नियोजन करण्यासाठी ते गावी आले होते. काही कामानिमित्त ते सोमवारी सायंकाळी कऱ्हाड येथे दुचाकीवरुन गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा आठ वर्षाचा मुलगा प्रणव होता. याशिवाय अहमद मैनुद्दीन झारी हा कॉलेजचा तरुणही त्यांच्यासोबत गाडीवर होता.
सोमवारी रात्री काम आटोपून ते कऱ्हाडहून खटाव गावी परतत होते. याचवेळी कऱ्हाड-खटाव गावादरम्यानच्या शामगाव घाटात समोरुन भरधाव आलेल्या बलोरो पीकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिली, त्यात दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता, की त्यात सर्वांचे चेहरे छिन्नविच्छिन्न झाले होते.
या अपघाताची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.