जिवंत काडतुसासह पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST2021-05-21T04:42:06+5:302021-05-21T04:42:06+5:30
फलटण : जिवंत काडतुसासह विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना फलटणच्या न्यायालयासमोर हजर केले ...

जिवंत काडतुसासह पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक
फलटण : जिवंत काडतुसासह विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना फलटणच्या न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळालेल्या माहिती अशी, फलटण शहरामध्ये दि. २० रोजी मध्यरात्री राजू राम बोके हा त्याच्या दोन साथीदारांसह एका मित्राला भेटायला येणार आहे. त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आहे. त्यानुसार तत्काळ दोन पंचांना बोलावून त्यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. पी. ठाकूर, पोलीस नाईक एम. डी. सुळ, एस. ए. तांबे, एन. डी. चतुरे, बी. एच. लावंड यांनी संबंधित ठिकाणी सापळा लावला.
मध्यरात्री पाऊणच्या सुमारास एका मोटारसायकलवरून तिघेजण येताना दिसले. त्यांना जागीच पकडून पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे राजू राम बोके (वय ३४, रा. मंगळवार पेठ, फलटण), दिलीप तुकाराम खुडे (३२, रा. लक्ष्मीनगर फलटण) व मनोज राजेंद्र हिप्परकर (२७, रा. प्रेमलाताई हायस्कूलजवळ, मलठण) अशी सांगितली. त्यांच्या झडती घेतली असता राजू राम बोके याच्या कमरेस एक पिस्तूल खोवलेली दिसून आली. त्याची मॅगझीन काढून पाहिली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले.
त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पिस्तूल, मोटारसायकल, तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्याबाबत भारतीय हत्यार अधिनियम ३,२५ भादंवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड तपास करीत आहेत. तिघाजणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार, दि. २४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
फोटो २०फलटण-क्राईम
फलटण पोलिसांनी विनापरवाना जिवंत काडतुसासह पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. (छाया : नसीर शिकलगार)