अत्याचाराचे चित्रीकरण करून विवाहितेला धमकी; युवकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:25+5:302021-02-05T09:20:25+5:30
सातारा : एका विवाहित महिलेवर सातारा, पोलादपूर, चिपळूण येथे वारंवार अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करीत ‘तू जर माझ्यासोबत लग्न ...

अत्याचाराचे चित्रीकरण करून विवाहितेला धमकी; युवकावर गुन्हा
सातारा : एका विवाहित महिलेवर सातारा, पोलादपूर, चिपळूण येथे वारंवार अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करीत ‘तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर जीवे मारून टाकण्या’ची धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. सलीम लियाकत मुजावर (वय ३०, रा. बाबर काॅलनी, करंजे पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित महिलेची आणि सलीमची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीनंतर सलीमने संबंधित महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत त्याचे मोबाईलवर फोटो काढून चित्रीकरणही केले. यानंतर सलीमने हे फोटो आणि चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. ‘तू जर माझ्याशी लग्न नाही केलेस तर हे चित्रीकरण, फोटो तुझे सासू, सासरे, पती, आई, वडील यांना दाखविणार,’ अशी धमकीही दिली.
सलीमने संबंधित महिलेवर सातारा, पोलादपूर, चिपळूण येथे वारंवार अत्याचार केला. हा संपूर्ण प्रकार ऑक्टोबर २०२० ते दि. २३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत वेळोवेळी घडला. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पीडित महिलेने सलीमच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे अधिक तपास करीत आहेत.