हजार महिलांनी घेतली स्वच्छतेची शपथ
By Admin | Updated: March 12, 2016 00:02 IST2016-03-11T22:22:17+5:302016-03-12T00:02:46+5:30
मलकापुरात मेळावा : घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन हजार बकेटचे वाटप

हजार महिलांनी घेतली स्वच्छतेची शपथ
मलकापूर : मलकापूर येथे आयोजित महिला मेळाव्यात स्वच्छ व सुंदर मलकापूरसाठी नगरपंचायतीच्या वतीने दोन हजार बकेटचे वाटप करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेत महिलांचाच सहभाग महत्त्वाचा समजून नगरपंचायतीने स्वच्छतेचा विशेष उपक्रम हाती घेतला. महिला मेळाव्याचे औचित्य साधून यावेळी हजार महिलांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
येथील नगरपंचायतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी कोल्हापूर येथील देवराई संस्थेच्या विश्वस्त अनुराधा सामंत, सत्वशीला चव्हाण, आहारतज्ज्ञ डॉ. रचना थोरात, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, सोनल भोसेकर, नगराध्यक्षा सुनंदा साठे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शंकरराव चांदे, राजेंद्र यादव, नयना वेळापुरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी सत्वशीला चव्हाण म्हणाल्या, ‘स्त्री ही शक्ती आहे. ती कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. मनात आणले तर जग बदलू शकते. हे मलकापूरच्या महिलांनी करून दाखवले आहे. म्हणूनच मलकापूरचे नाव देशात उज्ज्वल झाले. यापुढेही महिलांनी आपल्या वर्तनातून मलकापूरची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. मनावर व जिभेवर ताबा ठेवल्यास आरोग्य सुदृढ बनते.’
दरम्यान, यावेळी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, कॅन्सर यासारख्या रोगांबाबत प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘लक्षाधीश कन्यारत्न’ पावतीचे वितरण..
महिला दिनाचे औचित्य साधून नगरपंचायतीच्या वतीने प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत दोनशेपेक्षा जास्त लाभार्थिंना लक्षाधीश कन्या ठेव पावत्यांचा लाभ देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या पावत्यांचे वितरण करण्यात आले.