सातारच्या रस्त्यावर धावली हजारो चाके
By Admin | Updated: August 17, 2014 00:17 IST2014-08-17T00:17:39+5:302014-08-17T00:17:39+5:30
लोकमत माध्यम प्रायोजक : स्वातंत्र्यदिनी दिला पर्यावरणाचा संदेश

सातारच्या रस्त्यावर धावली हजारो चाके
सातारा : ‘या स्वातंत्र्यदिनी, भारताच्या पर्यावरणासाठी... हा संदेश जनमानसात रूजविण्यासाठी स्वातंत्र्यदिनी सातारा शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत चिमुकल्यासह आजोबांनीही हिरीरीने सहभाग घेतला. आठ ते बाहत्तर वयोगटातील सुमारे दीड हजार सायकलस्वारांनी यामध्ये सहभाग घेतला. या रॅलीचे माध्यम प्रायोजकत्व ‘लोकमत’ने स्वीकारले होते.
तालीम संघाच्या मैदानावरून सकाळी साडेदहा वाजता सायकल रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी अमर सायकल एजन्सीचे आशीष जेजुरीकर, नैतिक क्रिएशनच्या रश्मी साळवी, डॉ. जयदीप रेवले, नीलेश मोरे, हितेश सिंग, नयन गुळुंजकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तालीम मैदान येथून मोती चौकमार्गे शेटे चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाका, रयत शिक्षण संस्था मार्गे पुन्हा तालीम संघ मैदान अशी सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठांचा सहभाग लक्षणीय होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हात उंचावून ते प्रोत्साहन देत होते. अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात सायकल रॅलीचा उत्साह चित्रबद्ध करून ठेवला. लहानग्यांसह ज्येष्ठांनीही सातारकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली पार पडली.
सायकल रॅलीत सहभागी झाल्यामुळे मजा आली, अशा प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केल्या, तर सायकल चालविण्यामुळे मन प्रसन्न झाले, तसेच आरोग्याबरोबरच एक सामाजिक संदेश देता आला, अशा भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)