हजारो सातारकरांचा सायकल रॅलीत सहभाग
By Admin | Updated: August 16, 2016 23:00 IST2016-08-16T22:38:20+5:302016-08-16T23:00:00+5:30
सायकल क्रांती : पर्यावरणपूरक चळवळीस आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद--लोकमत सायकल क्रांती

हजारो सातारकरांचा सायकल रॅलीत सहभाग
सातारा : पर्यावरण संवर्धनासह नागरिकांमध्ये आरोग्य जपण्याची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने शहरात दैनिक ‘लोकमत’ साताऱ्यातील अमर सायकल एजन्सी, आणि फायर फॉक्स बाईक स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘सायकल क्रांती’ रॅलीत हजारो सातारकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थी, व्यावसायिक, डॉक्टर आदींसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला सहभाग हा या रॅलीचे वैशिष्ट ठरले.
१५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी रॅलीस तालीम संघापासून प्रारंभ झाला. यानंतर रॅली राजवाडामार्गे खालच्या रस्त्याने ५०१ पाटी, शेटे चौक, पोवई नाका, न्यायालय, जिल्हा परिषद, विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून पुन्हा पोवई नाका, शाहू चौक मार्गे तालीम संघ मैदानाकडे आली. या क्रांतीसाठी साताऱ्यातील मान्यवर, सायकल संघटना, हौशी तसेच प्रोफेशनल खेळाडू, व्यावसायिक, नोकरदार व शालेय विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
रविवारी सकाळपासूनच तालीम संघाच्या मैदानावर सायकलस्वारांची गर्दी होऊ लागली. रॅली सुरू होईपर्यंत हजारो सातारकर याठिकाणी उपस्थित झाले. रॅलीत सहभागी प्रत्येक स्पर्धकांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसून येत होता. रॅलीस प्रारंभ झाल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने रॅली शहरातून मार्गक्रमण झाली.
आरोग्यासह पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत राबविणे अत्यंत गरजेचे आहे. सायकल एक दिवस न चालविता सायकलचा दैनंदिन जीवनात वापर करावा, अशी भावना अनेक सायकलस्वार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
इंधन बचतीसह आरोग्य संवर्धन
‘सायकल क्रांती’ या चळवळीमुळेच दैनंदिन जीवनातील छोटे प्रवास सायकलवर केल्याने इंधन बचत तर होतेच त्याचप्रमाणे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. इंधन बचतीसह आरोग्य संगोपन आणि पर्यावरणजागृती अशा कित्येक बाबी आज सायकलिंगमुळे पूर्णत्वास जात आहे. अशा भावना रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
‘लोकमत’च्या माध्यमातून ही चळवळ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला. हजारोंच्या संख्येने सातारकरांनी ‘सायकल क्रांती’ या चळवळीत सहभागी होऊन सातारा शहर ‘सायकल सिटी’ म्हणून नावारूपास यावे यासाठी प्रयत्न केले. येणाऱ्या काळात इंधन बचत, प्रदूषणमुक्त वातावरण तयार होणार यात काही शंकाच नाही.
- आशिष जेजुरीकर