माणूस मारून विचार संपत नाहीत सत्यात उतरविले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:12+5:302021-03-28T04:36:12+5:30
साताऱ्यातून सुरू झालेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ आता ३१ वर्षांची झाली आहे. ही चळवळ महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत ३५० हून ...

माणूस मारून विचार संपत नाहीत सत्यात उतरविले...
साताऱ्यातून सुरू झालेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ आता ३१ वर्षांची झाली आहे. ही चळवळ महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत ३५० हून अधिक शाखांद्वारे विस्तारत आहे. याचे संनियंत्रण आणि कामकाज साताऱ्यातील तारांगण या मध्यवर्ती कार्यालयातूनच होते. या चळवळीचे मोठे संकट म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून. खरेतर कोणत्याही चळवळीचा नेता गेला की चळवळीचे अस्तित्व कमजोर होते किंवा बंद पडते; पण हा इतिहास अंनिसने खोटा ठरविला. माणूस मारून विचार संपत नाही, हेच सत्यात उतरविणारी अंनिसची चळवळ समाजाला निश्चितच दिशादर्शक ठरली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू करण्याला तत्कालीन काही कारण घडले होते. ते म्हणजे केरळमधील बी. प्रेमानंद यांचा महाराष्ट्र दौरा. या दौऱ्यातील शिबिरात साताऱ्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर सामील झाले होते. यामधील सहभागाने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात अधिक तीव्रतेने पडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, तसेच याच प्रेरणेतून महाराष्ट्र अंनिसची स्थापना साताऱ्यात १९८९ मध्ये झाली. याचवेळी पुण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. या जाहीरनाम्यानुसार तीन प्रकारचे कार्य अभिप्रेत होते. पहिली बाब म्हणजे शिक्षण क्षेत्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन.
याबाबतची पहिली परिषद १९९१ मध्ये सातारा येथे झाली. या परिषदेला अण्णासाहेब शिंदे, वि. म. दांडेकर उपस्थित होते. दुसरी बाब म्हणजे ‘अंधरूढीच्या बेड्या तोडा अभियान’ या विषयावर दोन परिषदा झाल्या. पहिली १९९६ व दुसरी १९९७ ला. या दोन्हीही परिषदा साताऱ्यातच झाल्या होत्या. तिसरा विषय म्हणजे स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन. या कालखंडात वैचारिक विकास करण्याच्या हेतूने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली. पुस्तक ‘अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’, दुसरे ‘भ्रम आणि निरास’, तिसरे पुस्तक ‘विचार तर कराल;, चौथे ‘अंधश्रद्धा विनाशाय’ व पाचवे ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ हे पुस्तक. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन हे मासिक वार्तापत्र वैचारिक लेख व समितीच्या कृतिशील कामांचा वृतांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवीत होते.
सातारा येथूनच वैज्ञानिक जाणिवा वाढविणारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची शिबिरे घेऊन विचारांचे आदान-प्रदान होत राहिले. याच काळात आणखी तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे अंनिस हे कार्यकर्त्यांचे संघटन असल्यामुळे संघटना गतिमान राहिली. जेथे-जेथे घटना घडल्या त्या ठिकाणी तेथील कार्यकर्ते चुकीच्या प्रकारांना सामोरे गेले, त्यांची उकल केली, तसेच बुवाबाजीविरोधात कृती केली. साताऱ्यात एक मोठी ज्योतिष परिषद झाली. या परिषदेवेळी अंनिसने कुंडलीची जाहीर होळी करून परिषदेला विरोध केला होता, तसेच दैववादाला विरोध करीत प्रयत्नवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणाचा वसा दिला. याच कालखंडात अंनिसने सातारा येथूनच तीन मोठ्या मोहिमा महाराष्ट्रात राबविल्या होत्या. पहिली मोहीम ‘युवा एल्गार.’ यामध्ये जवळपास २५ हजार संकल्पपत्रे महाविद्यालयातील तरुणाकडून भरून घेण्यात आली होती. दुसरी मोहीम होती ‘शोध भुताचा, बोध मनाचा.’ कोकणात भुताबाबत अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. या मोहिमेत तीन जथे करून संपूर्ण कोकण ढवळून काढला. तिसरी मोहीम होती ‘भानामतीविरोधी धडक मोहीम.’ ८ जथे करून ही ८० गावांत राबविली गेली. अशा पद्धतीने एका बाजूला संघटन, दुसऱ्या बाजूला चळवळ आणि तिसऱ्या बाजूला मोहिमा व त्यासाठीची वैचारिक मांडणी, असा अंनिसचा प्रवास सुरू राहिला. अंनिस केवळ प्रबोधनावर थांबत नाही, तर परिवर्तनवादी गांधियन पद्धतीने संघर्ष करण्यासाठी आजही तत्पर आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ठरविलेल्या ४ सूत्रांच्या आधारे ही वाटचाल अखंडपणे सुरू आहे व सुरू राहील, असा विश्वासही सर्वांना आहे.
शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार, विधायक धर्मचिकित्सा व समविचारी संघटनांना जोडून घेणे ही ४ सूत्रे आहेत. या ४ सूत्रांच्या मुळाशी आहे विवेकवाद आणि मानवतेचा विचार. समाजात योग्य दिशेने परिवर्तन करण्यासाठी सत्य काय? आणि असत्य काय, तसेच चांगले काय? आणि वाईट काय? याची चिकित्सा करावी लागते. ही चिकित्सा कशासाठी? तर समाजातील अन्याय, शोषण, विषमता नष्ट करून सर्व मानव समान आहेत. त्यांना त्यांच्या विचारानुसार प्रगतीचे स्वातंत्र्य आहे, या मूल्यांसाठी.
कोरोनाच्या परिस्थितीही साताऱ्याच्या अंनिसच्या मध्यवर्ती कार्यालयातून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रबोधनाचा हा वसा सुरूच आहे. यापुढेही तो सुरू राहील यात शंका नाही, तर भूतबाधा झाल्याचे सांगून दहीवडी येथील १४ वर्षांच्या मुलीचा घेतलेला बळी असेल किंवा करणी व जादूटोण्याची भीती घालणारा पाडेगाव (लोणंद) येथील भोंदूबाबा असेल यांना गजाआड करण्यात नुकतेच सातारा अंनिसला यश आले आहे. हे केवळ १८ वर्षांच्या दीर्घ प्रयत्नांनी अस्तित्वात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यामुळे, असेच समितीचे मत आहे. अशामुळे साताऱ्यातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ खऱ्याअर्थाने दिशादर्शकच ठरली आहे. या चळवळीने साताऱ्याचे नावही सर्वदूर पोहोचवले असून, याचा सातारकरांना अभिमानच आहे.
कोट :
अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीचा इतिहास मोठा आहे. गेल्या ३० वर्षांचा लेखाजोखा आठवताना मन भरून येते, ते अर्थात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणीनेच. त्यांचा सहवास आम्हाला शरीराने नसेल; पण त्यांनी दिलेल्या विवेकी विचारांनी आम्ही तो कृतिशीलपणे पुढे सुरू ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहोत आणि करीत राहू. माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार स्वतःच्या जीवनात अंगीकार करण्यास खऱ्या अर्थाने रुजविणाऱ्या अंनिसचा आम्हाला व सर्व सातारकरांना अभिमान आहे.
- प्रशांत पोतदार, अंनिस राज्य प्रधान सचिव
फोटो २७ अंनिस