आदर्कीत चाळीस वर्षांनंतर महापूर
By Admin | Updated: September 25, 2016 00:52 IST2016-09-25T00:52:58+5:302016-09-25T00:52:58+5:30
परतीच्या पावसाने झोडपले :

आदर्कीत चाळीस वर्षांनंतर महापूर
पुलाचा भराव १०० फूट वाहून गेला; आदर्की, सावतानगर पठाण वस्तीचा संपर्क तुटला
आदर्की : आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, कापशी, बिबी, सासवड, हिंगणगाव परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली तर आदर्कीच्या ओढ्याला महापूर येऊन शेतात व पाणीपुरवठा विहिरीत पुराचे पाणी शिरले. आदर्की खुर्द गावात येणाऱ्या पुलाचा भराव १०० फूट वाहून गेल्याने मोठ्या वाहनांना रस्ता बंद झाला.
आदर्की परिसरात मुसळधार पावसाने नालाबांध, पाझर तलाव, सिमेंट बंधारे ओसंडून वाहिले. पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, मूग, घेवडा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आदर्की खुर्द-हिंगणगाव ओढ्याला ४० वर्षांत पहिल्यांदाच महापूर आल्यामुळे शेतकरी वर्गाच्या शेतातील विहिरीत पाणी शिरले. तर ग्रामपंचायत आदर्की खुर्दच्या दोन पाणीपुरवठा विहिरीत पाणी शिरले. आदर्की खुर्द गावात येणाऱ्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने गावाचा दोन तास संपर्क तुटला होता.
रात्री उशिरा पाणी कमी झाल्यानंतर १०० फूट भराव वाहून गेल्याने दुपारी वाहतूक सुरू केली व मोठ्या वाहनांना रस्ता बंद करण्यात आला.
आदर्की बुद्रुक गावच्या हद्दीमधील पठाण वस्ती, कदम वस्तीवर जाणारा पूल व सावतानगर, बोडके वस्तीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन तास संपर्क तुटला होता.
आळजापूर परिसरातील पाणी धोम-बलकवडी कालव्यात शिरल्याने कापशी-सासवड ओढ्याला पाणी सोडल्याने कापशी गावात जाणारा रस्ता काहीकाळ बंद होता.
मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
आहे.
विहिरीचे पाणी न वापरण्याचे आवाहन
रात्री ९ वाजता मंडल अधिकारी विनोद सावंत, तलाठी डी. एस. क्षीरसागर, ग्रामसेवक बी. बी. लोणार, पोलिस पाटील महेश निंबाळकर यांनी पुलाची पाहणी केली.
ग्रामस्थशंना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी विहिरीचे पाणी दूषीत झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.