आंदोलनामुळे वाचले सातारकरांचे तीस कोटी
By Admin | Updated: November 7, 2014 23:29 IST2014-11-07T22:36:28+5:302014-11-07T23:29:56+5:30
‘पर्ल्स’रेट धोक्यात!

आंदोलनामुळे वाचले सातारकरांचे तीस कोटी
सातारा : ‘पर्ल्स’च्या विरोधात तीन वर्षांपूर्वी संदीप जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे ‘पर्ल्स’कडे येणारा गुंतवणूकदारांचा ओढा आपोआप थांबला होता. ‘पर्ल्स’ची आजची स्थिती लक्षात घेतला, तीन वर्षांपूर्वीच्या या आंदोलनामुळे सातारकरांचे जवळपास तीस कोटी रुपये वाचले आहेत. जर आंदोलन झाले नसते तरी कदाचित ही रक्कम त्याच्यापेक्षाही अधिक झाली असती.
सातारा जिल्ह्यात ‘पर्ल्स’ कंपनीने मोठ्या प्रमाणात जाळे तयार केले आहे. तीन वर्षांपूर्वी या कंपनीकडे दररोज साडेतीन लाखांच्या ठेवी गोळा होत होत्या. एखाद्या ग्राहकाला ठेव परत मिळाली तरी त्यापैकी तो अर्धी रक्कम पुन्हा एकदा ठेव ठेवायचा. यामुळे येथील महिन्याची सरासरी जमा होणारी रक्कम जवळपास एक कोटी होती. मात्र, तीन वर्षांपूर्वी ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीनंतर ‘अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास’चे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पर्ल्स’च्या विरोधात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा परिणाम इतका चांगला झाला की, येथे दररोज जमा होणाऱ्या रकमेपैकी एक लाख रुपये कमी झाले आणि हा आकडा दररोज केवळ पन्नास हजारांवर आला.
‘पर्ल्स’ने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आपले एजंट नेमून व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. विविध प्रकारच्या आमिषामुळे ठेवीदारही त्याकडे आकर्षित झाले होते. मात्र, कालांतराने कंपनीने ठेवीदारांना ठेवी परत करताना अनेक कारणे देत नकार दिला होता. यामुळे अनेक तक्रारीही झाल्या. ‘पर्ल्स’ला एक पाऊल मागे यावे लागले. तरीही एजंटांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला आणि ठेवीदारही त्याला भुलले. (प्रतिनिधी)
‘सेबी’ची नोटीस तरीही...
‘पर्ल्स’ने गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करणे बेकायदेशीर असल्याची नोटीस ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया’ तथा ‘सेबी’ने बजावली होती. ‘सेबी’च्या निर्देशानंतरही ‘पर्ल्स’ अनधिकाराने व्यवहार करत होती आणि गुंतवणूकदार तसेच ठेवीदार त्यांच्या आर्थिक आमिषाला भुलत होते.