सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनच्या तीस बेडची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:43+5:302021-05-05T05:03:43+5:30

कुडाळ : जावळी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सोमर्डी, ...

Thirty beds of oxygen at Somardi Rural Hospital | सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनच्या तीस बेडची सोय

सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनच्या तीस बेडची सोय

कुडाळ : जावळी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सोमर्डी, ता. जावळी येथील ग्रामीण रुग्णालयात तीस ऑक्सिजन बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अंमलबजावणीही सुरू केल्याने तालुक्यातील कोविड रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सोपान टोणपे यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस बाधितांची वाढती संख्या पाहता अपुरी बेड संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे सामान्य रुग्णांची उपचाराअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. तसेच आतापर्यंत तालुक्यात ११५ हून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळीही घेतला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने काहींना आपला जीव गमावण्याची वेळ आल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत सोमर्डी याठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली होती.

जिल्हा प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात तीस बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे या रुग्णालयात तीस ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुडाळ तसेच करहर विभागातील रुग्णांसाठी सोय होणार आहे. या कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना मेढा किंवा सातारा येथे बेडसाठी धावाधाव करण्याची वेळ येणार नाही.

या रुग्णालयात सध्या या ठिकाणी चार वैद्यकीय अधिकारी, सहा परिचारिका, चार वाॅर्ड बाॅय अशा चौदा आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रुग्णांना योग्य ते उपचार व सेवा मिळणार असून, रुग्णांवर उपचारही सुरू झाले आहेत.

प्रांताधिकारी सोपान टोणपे यांच्यासह तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी या रुग्णालयाची पाहणी करून आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत आदेश दिले आहेत.

फोटो : ०३बामणोली

सोमर्डी, ता. जावळी येथील कोरोना रुग्णालयातील सुविधेची प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी पाहणी केली. (छाया : विशाल जमदाडे)

Web Title: Thirty beds of oxygen at Somardi Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.